हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना राज्यात अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना उघडकीस येत आहेत. नाशिक जिल्ह्यात एका विवाहित महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमाने विवाहित महिलेला भेटण्याच्या बहाण्याने शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर पीडितेवर बलात्कार करून नराधमाने आपल्या मोबाइलमध्ये अश्लिल चित्रिकरण केले. तसेच पीडितेला बदनामीची धमकीही दिली. या प्रकरणी दोषी बाळू गिरीधर जाधव याच्यावर इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च ते ऑक्टोबर 2019 या कालावधीत बाळू जाधव याने पीडित महिलेला भेटण्याचा बहाणा करत पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये नेले. त्यानंतर तेथे या महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. पीडित महिला शुद्धीवर आल्यानंतर तिला आपल्यावर बलात्कार झाल्याचे समजले. त्यानंतर पीडित महिलेने दोषीला याबाबत जाब विचारला. (हेही वाचा - धक्कादायक! सात वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करुन डोक्यात दगड धालून केली मुलीची निर्घृण हत्या; चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय)
दरम्यान, नराधमाने पीडित महिलेला सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केल्याचे सांगितले. तसेच या घटनेविषयी कोणालाही सांगितले, तर नातेवाईक आणि पीडितेच्या पतीला हा व्हिडिओ पाठवण्यात येईल, अशी धमकी दिली. त्यानंतर या नराधमाने या व्हिडिओचा आधार घेत पीडितेवर परिसरातील अनेक हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला. तसेच पीडितेला ब्लॅकमेल करत मोबाईलमधील चित्रीकरण डिलिट करण्यासाठी अनेकदा पैसेही मागितले.
अखेर पीडित महिलेने या छळाला कंटाळून आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी पीडितेला साध देत इंदिरानगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नाशिकमधील आदिवासी भागातील सुरगाणा गावात 19 वर्षीय गतिमंद मुलीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.