देशात हैदराबाद, उन्नाव येथील महिलांवरील अत्याचाराच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना भिवंडी (Bhiwandi) जिल्ह्यात क्रूरतेने कळस गाठला आहे. येथे एका इसमाने 7 ते 8 वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करुन तिची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्यूज 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी शनिवारी रात्री 9 वाजता घराबाहेर खेळत होती. तेव्हापासून ती बेपत्ता होती. आज सकाळी घरापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या झुडपात मुलीचा मृतदेह आढळून आला. अज्ञात नराधमाने मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचा केल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे ज्या आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली असावी असेही तपासात दिसून येतय.
हेदेखील वाचा- हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर
याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आसपासच्या परिसरातील चौकशी करुन आरोपीचा शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये 27 वर्षीय महिला वेटरनरी डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर तिला जाळून मारल्याचे घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई व्हावी ही मागणी जोर धरु लागली होती. अखेर हा गुन्हा करणाऱ्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिस याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी या आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जात होते. त्यामुळे पोलिसांनी चारही आरोपींवर गोळीबार केला.