हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर
Hyderabad Murder Case (Photo Credits-ANI)

हैदराबादमध्ये मागील आठवड्यात 27 वर्षीय महिला वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून तिला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली होती. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. हा गुन्हा करणाऱ्या चारही आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिस याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावेळी या आरोपींनी पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून जात होते. त्यामुळे पोलिसांनी चारही आरोपींवर गोळीबार केला. यात चारही जणांचा मृत्यू झाला आहे. हैदरबादमध्ये झालेल्या या बलात्कारानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी हैदराबादमध्ये सायबराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. दरम्यान, पीडितीच्या शवविश्चेदनात तिच्यावर बलात्कार करून जाळण्यात आल्याचा खुलासा झाला होता.

पशु चिकित्सक पीडित महिला डॉक्टर बुधवारी कोल्लरु येथील पशु चिकित्सालयात गेली होती. तेथे जवळच असलेल्या शादनगर टोल नाक्यावर तिने स्कुटी पार्क केली. रात्री जेव्हा महिला तेथे आली त्यावेळी स्कुटी पंक्चर झाली होती. यावर तिने प्रथम बहिणीला फोन लावला आणि याची माहिती दिली. यावेळी तिने बहिणीला मला भीती वाटत असल्याचे ही म्हटले होते. यावर बहिणीने तिला टॅक्सीने घरी येण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने काही लोकांकडे मदत मागितली. त्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. पीडित महिलेच्या नातेवाईकांनी तिचा टोल प्लाझा येथे शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तिचा तपास लागला नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित महिलेचा जळालेला मृतदेह भुयारी मार्गाचा येथे आढळून आला होता.

हेही वाचा- हैदराबाद: महिला डॉक्टरवर बलात्कार केल्यानंतर जीवंत जाळल्याने देशभरातून संतापाची लाट

या पीडितेवर 4 जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. पीडितेला जवळपास 7 तास बांधून ठेवण्यात आले होते. त्यानंतर चारही जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं होतं. त्यात ट्रक ड्रायव्हरसह त्यांच्या क्लिनर्सनी पीडितीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती.