दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज (Delhi's Nizamuddin Markaz) येथील धार्मिक कार्यक्रमात देश विदेशातील नऊ हजाराहून अधिक लोक सामील झाले होते. या ठिकाणी सामील झालेल्या लोकांमध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित लोकांचाही समावेश होता. ही माहिती उघड झाल्यावर केंद्र सरकारसह राज्य सरकारचे धाबे दणाणले आहे. आता या सर्व लोकांना शोधून त्यांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्याची प्रक्रिया सुरु आहेत. अशात महाराष्ट्रातील एकूण 1062 लोक या कार्यक्रमासाठी हजर असल्याची माहिती मिळत आहे. यापैकी 890 जणांचा शोध लागला असून, त्यातील 4 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे.
एएनआय ट्वीट -
There are 1062 people in Maharashtra who attended Delhi's Nizamuddin Markaz, of which 890 have been traced. Of them, 4 persons are #COVID19 positive;2 each from Pimpri-Chinchwad & Ahmednagar. There are total 423 positive cases in state & 20 deaths, so far: State Health Department
— ANI (@ANI) April 2, 2020
राज्य आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. या 4 कोरोना बाधित रुग्णांपैकी दोन पिंपरी-चिंचवड येथील तर, दोन अहमदनगर येथील आहेत. राज्यात आज कोरोना बाधित 81 नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील 57 रुग्ण मुंबई, 6 पुणे, 3 पिंपरी चिंचवड, 9 अहमदनगर, 5 ठाणे, 1 बुलढाणा रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 416 झाली आहे. आतापर्यंत 42 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
राजधानीबद्दल बोलायचे झाले तर आज दिल्लीत कोरोना विषाणूची 141 प्रकरणे समोर आली आहेत. आता दिल्लीत एकूण प्रकरणांची संख्या 293 झाली आहे. 141 पैकी 129 प्रकरणे तबलीघी मरकजशी संबंधित आहेत व मरकझ संबंधित एकूण बाधितांचा आकडा 182 झाला आहे.
भारतातील कोरोना विषाणूची प्रकरणे आता झपाट्याने वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 2069 घटनांची नोंद झाली आहे. या प्राणघातक विषाणूमुळे 53 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 155 लोक बरे झाले आहेत किंवा त्यांना सोडण्यात आले आहे. आतापर्यंत देशातील 29 राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे.
जगातील घटनांबद्दल बोलायचे झाले तर, 2 एप्रिल 2020 रोजी म्हणजेच आजपर्यंत कोरोना विषाणूच्या जगभरात 1 दशलक्ष पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद झाली असून, 50,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.