राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सरकार मोफत चष्मे पुरवणार
Representational Image (Photo Credits : PTI)

राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सरकार (Maharashtra Government) मोफत चष्मे (Free Spectacles) पुरवणार आहे. विद्यार्थ्यांमधील दृष्टिदोष निवारण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेसाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य' कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. सध्या राज्यात एकूण 1195 वैद्यकीय पथके कार्यरत आहे. या वैद्यकीय पथकाने विद्यार्थ्यांच्या तपासण्या केल्या असून यात विद्यार्थ्यांमधील दृष्टिदोषाचे प्रमाण वाढलेले आढळले आहे. राज्यातील शाळांमध्ये 1 कोटी 21 लाख 67 हजार 585 इतकी मुलं शिकत आहेत. यातील 8 टक्के विद्यार्थ्यांना दृष्टिदोषाचा त्रास आहे. (हेही वाचा - निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टात जामीन मंजूर)

या मुलांना चष्मे उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत सुधारणा होईल, यासाठी राज्य सरकारने विद्यार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. साधारणत: एका चष्म्याची सरासरी किंमत 200 रुपये असून 25 टक्के विद्यार्थ्यांचा चष्म्याचा नंबर पुढील वर्षात बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्त खर्च येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दृष्टिदोष असलेल्या विद्यार्थ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे निश्चित करण्यात आलेल्या पुरवठादाराकडून त्याच्या घरी किंवा शाळेत मोफत चष्मा पुरवण्यात येणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.