Kolhapur: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात अत्यंत धक्कादायक बातम्या समोर येत आहेत. अशातचं आता कोल्हापूरातून आणखी एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. कोल्हापूरात पत्नी, मुलगा आणि मुलीला कालव्यात ढकलून पतीने स्वतः कर्नाटकात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. सुदैवाने या घटनेत पोहता येत असल्याने मुलीचा जीव वाचला आहे. मुलीवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
स्थानिकांच्या मदतीने मुलगी कालव्याबाहेर आली. कालव्यात ढकलून दिल्याने राजश्री संदीप पाटील (वय 32) व सन्मित संदीप पाटील (वय 8) यांचा बुडून मृत्यू झाला. तसेच मुलगी श्रेया (वय 14) हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीने आईसह मला आणि माझ्या भावाला वडिलांनी कालव्यात ढकलून दिल्याचा जबाब नोंदवला आहे. (हेही वाचा - Heart Attack On Camera: नवरदेवाला हळदी लावताच 40 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल)
तथापी, मृत आरोपी संदीप याने शुक्रवारी कर्नाटकातील भोज येथे आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार पाटील कुटुंबीय करवीर तालुक्यातील हलसवडे गावचे आहे. मृत संदीपचा डॉल्बी साउंड सिस्टिमचा व्यवसाय होता. संदीप आपल्या पत्नीसह मुलांना घेऊन बाहेर गेला होता. त्यानंतर त्याने पत्नी आणि मुलांना कालव्यात ढकलून दिले. तसेच शुक्रवारी कर्नाटकात जावून त्याने आत्महत्या केली.
दरम्यान, कालव्यात जखमी अवस्थेत बाहेर आलेल्या मुलीने स्थानिकांना आई आणि भाऊ कालव्यात पडले असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच गर्दी जमली. पोलिसांनी शोधमोहीम राबवून राजश्री आणि सन्मितचा मृतदेह कालव्याबाहेर काढला. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.