Fungal infection | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाची लाट राज्यात मोठ्या प्रमाणावर असतानाच आता म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) नावाचा आजारही राज्यात डोके वर काढताना दिसत आहे. म्युकोरमायकोसिस आजाराबाबत महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. म्युकोरमायकोसिस हा तसा दुर्मिळ आजार आहे. मात्र, कोरोना उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांमध्ये अचानक या आजारची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे या आजारावरील औषधांचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, या आजाराचा संभाव्य धोका विचारात घेऊन राज्य सरकार उपाययोजना करत आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून राज्य सरकारने म्युकोरमायकोसिस आजाराच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शन्सची सुमारे 1 लाख नग इतक्या प्रमाणात ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला (Haffkine institute) देण्यात आल्याचे वृत्त आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकार म्युकोरमायकोसिस (Mucormycosis) आजाराबाबत करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. राजेश टोपे यांनी या आधीच स्पष्ट केले आहे की, म्युकोरमायकोसिस संक्रमित रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जातील. दरम्यान, राज्य सरकारने म्युकोरमायकोसिस आजारावरील उपचारांसाठी लागणाऱ्या 1 लाख इंजेक्शन्सची ऑर्डरही हाफकिन इन्स्टिट्यूटला दिल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Mucormycosis Disease: म्युकरमायकोसीस रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार- राजेश टोपे)

म्युकरमायकोसीस आजाराची लक्षणे सांगताना राजेश टोपे म्हणाले, ज्या नागरिकांना या आजाराचा संसर्ग होतो त्यांना नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका दिसून येतो. हा टीपका दिसू लागताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार केले नाहीत तर हा आजार बळावतो. तसेच या आजाराचा संसर्ग वाढून श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आजाराचे लवकरच निदान झाले तर उपचार करणे सोपे जाते. त्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचेही टोपे या वेळी म्हणाले.

दरम्यान, म्युकरमायकोसीस आजारावरील उपचार आणि औषधे महागडी आहेत. त्यातच कोरोना व्हायरस महामारी काळात या औषधांची विक्री चढ्या भावाने होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना सोईस्कर व्हावे यासाठी राज्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजारांवर मोफत उपचार केले जातील असे राजेश टोपे यांनी सांगितले. याशिवाय म्युकरमायकोसीस आजारावरील औषधे चढ्या दराने विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगतानाच लवकरच या आजारांवरील औषधांच्या किमीत निश्चित केल्या जातील असेही टोपे यांनी सांगितले.