Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेल्या असंख्य रुग्णांना म्युकरमायकोसीस (Mucormycosis) हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे पुढे आले आहे. या आजाराची राज्याच्या आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतील असून, उपचारास प्राधान्य दिले आहे. सर्वसामान्यपणे या आजारांवरील उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सर्वसामान्यांना या आजारांच्या उपचारासाठी आर्थिक भार पडू नये यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, राज्यातील म्युकरमायकोसीस आजाराने (Mucormycosis Disease) ग्रस्त असलेल्या नागरिकांवर मोफत उपचार केले जातील. म्युकरमायकोसीस ग्रस्त रुग्णांवर 'महात्मा फुले जनआरोग्य' (Mahatma Phule Jan Arogya Yojana) योजनेतून मोफत उपचार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे हे जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी बोलताना राजेश टोपे यांनी ही मोठी घोषणा केली. राजेश टोपे म्हणाले की, कोरोना व्हायरस संसर्गातून उपचार घेऊन बाहेर पडल्यानंतर काही नागरिकांना म्युकरमायकोसीस हा बुरशीजन्य आजार होत असल्याचे पुढे आले आहे. या आजारावर वेळीच उपचार केले नाहीत तर हा आजार बळावतो. तसेच शरीरातील अंतर्गत भागात प्रवेश करु शकतो. यामुळे नागरिकांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे या आजाराची लक्षणे दिसताच शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरु करणे आवश्यक आहे. वेळीच उपचार झाल्यास संभाव्य त्रास टाळण्यास मदत होते, असेही राजेश टोपे म्हणाले. (हेही वाचा, COVID 19 Management In BMC: 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच हे शक्य', मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचे कौतुकोद्गार)

म्युकरमायकोसीस आजाराची लक्षणे

म्युकरमायकोसीस आजाराची लक्षणे सांगताना राजेश टोपे म्हणाले, ज्या नागरिकांना या आजाराचा संसर्ग होतो त्यांना नाकाजवळ, ओठाजवळ काळसर ठिपका दिसून येतो. हा टीपका दिसू लागताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार केले नाहीत तर हा आजार बळावतो. तसेच या आजाराचा संसर्ग वाढून श्वसन, मेंदू, डोळ्यांवर विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या आजाराचे लवकरच निदान झाले तर उपचार करणे सोपे जाते. त्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक असल्याचेही टोपे या वेळी म्हणाले.

दरम्यान, म्युकरमायकोसीस आजारावरील उपचार आणि औषधे महागडी आहेत. त्यातच कोरोना व्हायरस महामारी काळात या औषधांची विक्री चढ्या भावाने होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना सोईस्कर व्हावे यासाठी राज्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या 1000 रुग्णालयांमध्ये या आजारांवर मोफत उपचार केले जातील असे राजेश टोपे यांनी सांगितले. याशिवाय म्युकरमायकोसीस आजारावरील औषधे चढ्या दराने विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे सांगतानाच लवकरच या आजारांवरील औषधांच्या किमीत निश्चित केल्या जातील असेही टोपे यांनी सांगितले.