अत्यंत रहदारी आणि लोकसंख्येची घनात अधिक प्रमाणात असलेले शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत (Mumbai ) कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळाले. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिका (BMC ) प्रशासनाने केलेले काम पहाता सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान मोदी आणि आता निती आयोगानेही कौतुक केले आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने कोरोना आव्हान नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत आणि त्याच्या यशाबाबत सांगताना मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री मिळाला हे माझे नशीब आहे. त्यांनी मला पूर्णपणे निर्णय स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच मी हे करु शकलो, असेही इक्बालसिंह चहल यांनी म्हटले आहे.
इक्बालसिंह चहल यांनी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मुंबईने मिळवलेल्या यशाबाबत सांगताना इक्बाल सिंह चहल यांनी म्हटले आहे की, या संपूर्ण लढ्याला यश येण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आहेत. त्यांनी मला कोरोना विरुद्ध रणनिती आखताना पूर्ण स्वातंत्र्य दिले. विविध शहरांतील माझ्या सहकाऱ्यांना अशा प्रकारचे स्वातंत्र्य मिळत नाही. त्या बाबतीत मी नशिबवान आहे. त्यामुळेच मला अनेक गोष्टी करणे सहज शक्य झाल्याचेही इक्बालसिंह चहल यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबई महापालिकेकडून 50 लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले जाणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती)
इक्बाल सिंह चहल यांनी पुढे बोलताना सांगितले की, मी जेव्हा आयुक्त म्हणून मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतली तेव्हा मुंबईत कोोरनाची पहिली लाट सुरु होती. ही लाट उच्च टोकावर होती. या वेळी सूत्रे हाती घेताच मी माझ्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतले. त्यांना सांगितले की, कोरोना व्हायरस हे संकट काई इतक्यात जाणार नाही. त्यासाठी बराच काळ काम करायचे आहे. त्यामुळे त्यासाठी आपल्याला दीर्घकालीन नियोजन करावे लागेल. त्यानुसार आम्ही रणनिती आखली आणि काम सुरु केले.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही केलेल्या नियोजनाचा आम्हाला फायदा असा झाला की एखाद्या दिवशी मुंबई शहरामध्ये जर 10, 000 पेक्षाही अधिक रुग्णसंख्या नोंदली गेली तरी यंत्रणेवर ताण येत नाही. तसेच, काही ठिकाणी एखाद्या गोष्टीची कमी राहिली तर मला कोणाचा फोनही येत नाही, असेही चहल म्हणाले. एखाद्या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यास त्याचा अहवाल रुग्णाला थेट न देता पालिकेला देण्याचे बंधन करणारी मुंबई महापालिका ही देशातील पहिलीच असावी. सुरुवातीला लॅबवाले दररोज सायंकाळी 7 वाजता चाचण्यांचे अहवाल रुग्णांना देत असत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टर, दवाखना आणि बेड यांसाठी एकच धावाधाव होत असे. त्यामुळे एका पेशंटसाठी 200 लोक बाधित होण्याचा धोका होता. त्यामुळे आम्ही ही पद्धत बदलली. त्यामुळे रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचाही त्रास कमी झाला, असे चहल यांनी सांगितले.