Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) सध्या कोरोना विषाणू (Coronavirus) लढत असताना, आता राज्यावर निसर्ग चक्रीवादळाचेही (Cyclone Nisarga) संकट चालून आले आहे. अशात आज राज्यात 2287 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ व 103 मृत्यूंची नोंद झाली व एकूण रुग्ण संख्या आता 72,300 अशी झाली आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे, आज नवीन 1225 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 31,333 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 38,493 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सरकारच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी काही रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

एएनआय ट्वीट -

सध्या राज्य सरकार या विषाणूशी सामना करताना जीवाची बाजी लावत आहेत. अशात राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने, बॉम्बे हॉस्पीटल, जसलोक हॉस्पीटल, हिंदुजा हॉस्पीटल, लिलावती हॉस्पीटल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई करणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. पुढे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील 80% खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. याची दखल घेऊन काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना रात्री 2 पर्यंत त्यांनी भेटी दिल्या. (हेही वाचा: धारावीत आज कोरोनाच्या 25 रुग्णांची भर पडल्याने आकडा 1830 वर पोहचला तर 71 जणांचा बळी- BMC)

दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे, कोरोना विषाणूमुळे होत असलेला प्रादुर्भाव टाळण्यासाठी SARS COV- 2 ही लस तात्काळ विकसित करण्यासाठी संशोधन हाती घेण्यात आले आहे. या संशोधन प्रकल्पासाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला 30 माकडांची आवश्यकता आहे. ही 30 माकडे राज्याच्या हद्दीतील घेण्यात येणार असून, कोरोना प्रतिबंधात्मक लसचा सर्वप्रथम प्रयोग या माकडांवर करण्यात येईल.