रिक्षाचालक जारी करत आहे चालान (संग्रहित संपादित प्रतिमा)

गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, ठाण्यातील (Thane) एक रिक्षाचालक आरटीओच्या फ्लाइंग स्क्वाडच्या उपस्थितीत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लोकांना चक्क चालान जारी करताना दिसला. सोशल मिडिया व्यासपीठ X वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केलेल्या कथित व्हिडिओमध्ये, एक लाल रंगाचा शर्ट घातलेला माणूस रहदारीचे उल्लंघन करणार्‍या लोकांना कथितपणे चालान जारी करताना दिसत आहे. त्यावेळी त्याच्या हातात आरटीओ मशीनदेखील दिसत आहे.

ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ शूट केला आहे त्याचा आवाज व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे, ज्यामध्ये तो रिक्षा चालकाला त्याची पोस्ट कोणती असे विचारत आहे. जेव्हा हा चालक आपण रिक्षा चालवत असल्याचे सांगतो, त्यावेळी व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती. ‘तुम्ही हे सरकारी मशीन तुम्ही कसे काय वापरू शकता?’ असा प्रश्न उपस्थित करते. त्यावेळी आरटीओ फ्लाइंग स्क्वॉड शेजारच्या गाडीतच बसलेले दिसून येत आहेत. त्यांच्या मते त्यांनी या रिक्षा चालकावर कारवाई केली होती. मात्र त्यानंतर परिवहन मंडळाचे मशीन रिक्षा चालकाकडे देण्यात आले.

ठाणे आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारे मशीन आयुक्तांच्या विशेष पथकाचे आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, परिवहन आयुक्त कार्यालय या प्रकरणाची चौकशी करत असून संबंधित अधिकाऱ्यांकडून खुलासा मागितला आहे.’ (हेही वाचा: Thane News: आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांवर दगडफेक,थरारक घटना सीसीटीव्हीत कैद)

वाहतूक तज्ज्ञ जितेंद्र गुप्ता यांनी या घटनेवर टीका करताना म्हटले आहे की, ‘एका रिक्षा चालकाच्या हातात मशीन देणारे अधिकारी बेजबाबदार दिसत आहेत. त्यांचे काम ते एका परक्या ड्रायव्हरला करायला सांगत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’ हा व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.