अभ्यास सोडून भलत्याच कृत्यात गुंतलेल्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. छातीत सुरा खुपसल्याने जखमी होऊन या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ठाणे (Thane) शहरातील वागळे इस्टेट (Wagle Estate) परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयात (Rajarshi Shahu Maharaj Vidyalaya) इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन गटात काही कारणावरुन जोरदार संघर्ष निर्माण झाला. या संगर्षाचे पर्यावसण मोठ्या भांडणात झाले. अवघ्या 15-16 वर्षे वयाच्या या मुलांनी एकमेकांवर जीवघेणा हल्ला केला.
ठाण्यातील प्रगती रुग्णालय येथील पाईपलाईन ब्रिजवर विद्यार्थ्यांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात तीन विद्यार्थी अधिक आक्रमक झाले. त्यांनी एका विद्यार्थ्याच्या छातीत सुरा खुपसला आणि त्याची निर्घृण हत्या केली. जखमी विद्यार्थ्यी गंभीर असल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले. घाव वर्मी लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी माहिती देताना सांगितले.
कोरोना काळात बंद असलेली विद्यालये आता कुठे सुरु होत आहेत. त्यामुळे शाळा, विद्यालय, महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिक्षकांसह विद्याद्यर्थीही शिक्षण आणि अभ्यासक्रमाकडे मोठ्या काळजीपूर्वक पाहात आहेत. अशात प्रदीर्घ काळ पडलेला अभ्यासाचा खंड अधिकाधिक भरून काढण्यास विद्यार्थी भर देत आहेत. यात काही विद्यार्थी मात्र भलत्याच कृत्यात अडकले आहेत. हे विद्यार्थी गुन्हेगारी वर्तुळाकडे खेचले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातही मोठ्या प्रमाणावर चींतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, राज्यात शाळा, महाविद्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. मात्र, तत्पूर्वी कोरोना नियमांचे पालण करणे आवश्यक असल्याचे नियम आणि अटीही घालून दिल्या आहेत. प्रामुख्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असायला हवेत. याशिवाय शाळेत मास्क, सॅनिटायझर बंधनकारक आहे. तसेच, देहअंतरही पाळावे लागणार आहे.