Thane: गॅस गळतीमुळे मृत्यू झाल्याचे भासवून पत्नीची हत्या करणारा आरोपी गजाआड
Image Used for Representational Purpose Only. (Photo Credits: ANI)

क्राईम मालिकांच्या (Crime Serials) प्रभावातून एका व्यक्तीने गळा घोटून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. ठाण्यातील (Thane) मुंब्रा (Mumbra) येथील ही घटना असून आरोपीने हत्येनंतर सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि गॅसच्या स्फोटात बायकोचा मृत्यू झाल्याचे सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, सदाफ (22) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शाहनवाज सैफी याला अटक केली आहे.

मुंब्रा पोलिस स्टेशनचे सिनियल इन्स्पेक्टर मधुकर कड यांनी सांगितले की, बुधवारी सकाळी आरोपीने गळा आवळून पत्नीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आणि मुलीसह मुरादाबादला जाण्यासाठी निघाला. दरम्यान, पीडितेचे वडील तिला फोन करत होते. मात्र सातत्याने फोन करुनही ती फोन उचलत नसल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना घरी पाहण्यास सांगितले. ते घरी पोहचले तेव्हा त्यांना महिलेचा मृतदेह दिसला आणि मुलगी बेपत्ता असल्याचे निर्दशनास आले. त्याचबरोबर संपूर्ण घरभर गॅस पसरला होता, असेही कड यांनी सांगितले. (Navi Mumbai: पत्नीकडे शरीरसुखाची मागणी, दुकानदाराकडून 80 वर्षीय व्यक्तीची हत्या)

आरोपी वेडिंगचे काम करत असून पीडितेसोबत त्याची ऑनलाईन ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न केले. मात्र त्यांच्यात अनेक बाबतीत भिन्नता असल्याने त्यांची सातत्याने भांडणे होत असतं. ती नोकरी करत असल्याचे त्याला आवडत नव्हते. मात्र ती नोकरी करण्यावर ठाम होती. याचाच राग मनात धरून त्याने तिचा काटा काढण्याचे ठरवले.

ऑनलाईन क्राईम सिरियल पाहिल्यानंतर त्याने तिला मारण्याचा डाव रचला.  सुरुवातीला त्याने तिचा गळा दाबला आणि शरीराचे काही भाग जाळले. त्यानंतर त्याने गॅस सिलेंडरची टॅब ओपन केली. परंतु, तितक्यातच तिचे नातेवाईक घटनास्थळी पोहचल्याने स्फोट होणे टाळता आले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली आणि RPF च्या मदतीने आरोपीला इटारसी स्टेशनवरुन परत आणून अटक करण्यात आली.