प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ठाणे (Thane) येथे शनिवारी (13 जुलै) संध्याकाळपासून अचानक बेपत्ता झालेल्या दोन बालमित्रांचे मृतदेह मिठागर खाडीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर दोन्ही बालमित्रांचा खाडीत बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज कोपरी पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभम देवकर आणि प्रवीण कंचारी अशी दोन मृत मुलांची नावे आहेत. कोपरी येथील सुभाष नगर येथे हे दोघे राहत असून नववीच्या इयत्तेत शिकत होते. मात्र शनिवारी दुपार पासून शुभम आणि प्रवीण अचानक बेपत्ता झाले. सायंकाळ झाली तरीही दोघे घरी न परतल्याने त्यांची पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी शुभम आणि प्रवीण याचा शोध घेण्यास सुरुवात केली. अखेर कोपरीतील मिठागराच्या येथे या दोन जणांचे मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.(मुंबईत 'स्वाईन फ्लू' चा पहिला बळी, केईएम रुग्णालयात तरुणीचा मृत्यू)

त्यानुसार पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी दाखल होताच तरंगत असलेल्या दोघांच्या मृतदेहांना बाहेर काढण्यात आल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. त्याचसोबत दोघांच्या शरीरावर कोणतीही खुण किंवा जखमा नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परंतु मिठागराच्या खाडीत पोहण्यासाठी आलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी स्पष्ट केला आहे.