ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ: अंबरनाथ ते मीरा-भाईंदर चे उमेदवार, महत्त्वाच्या लढती आणि निकाल घ्या जाणून
ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ (Photo Credits: File Image)

Maharashtra Assembly Elections 2019: ठाणे (Thane) जिल्ह्याचा भौगोलिक, राजकीय विस्तार मोठा असल्याने याठिकाणी अनेक महत्वाच्या लढती पाहायला मिळणार आहेत. ठाणे जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 18 मतदारसंघ असून काही निवडक ठिकाणे सोडल्यास अनेक जागा या सुरुवातीपासूनच शिवसेना (Shivsena) आणि भाजपाच्या (BJP) हाती आहेत.  तर उल्हासनगर सहित केवळ 3 ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने  288 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तत्पूर्वी ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघांचा एक आढावा सादर करत आहोत. यामध्ये अंबरनाथ (Ambernath), उल्हासनगर  (Ulhasnagar), कल्याण पूर्व (Kalyan East), डोंबिवली (Dombivali), कल्याण पश्चिम (Kalyan West) आणि मिरा -भाईंदर (Mira- Bhayandar) या जागांचा समावेश आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ

अंबरनाथ येथे 2009 पासून शिवसेनेची सत्ता आहे. डॉ. बालाजी किणीकर यांनी 2009 मध्ये 50 हजार तर 2014 मध्ये 47 हजाराहून अधिक मते मिळवून आमदारकीची विजयी पताका रोवली होती. यंदा किणीकर यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले आहे तर, त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे प्रवीण खरात, मनसेचे सुमेत भंवर आणि वंचित बहुजनचे जानू मानकर यांचे आव्हान असणार आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ

2009 च्या निवडणुकीनंतर भाजपाच्या हातात असणारा हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांनी 2014 मध्ये अवघ्या दीड हजारांच्या मताधिक्याने जिंकून घेतला होता. यंदा देखील राष्ट्रवादी कडूनच ज्योती निवडणूक लढवणार आहेत तर त्यांच्यासमोर काँग्रेसचे रोहित साळवे, भाजपाचे कुमार एलानी, वंचित बहुजचे साजन लभाना आणि अपक्ष म्हणून भगवान भालेराव यांची आव्हान आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ

कल्याण पूर्व मतदारसंघाची खासियत अशी की मागील दोन्ही निवडणुकांमध्ये याठिकाणी अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता.यंदा गायकवाड यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले आहे. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे प्रकाश तरे आणि अपक्ष उमेदवार धनंजय बडोरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 

कल्याण पश्चिम येथे 2014 च्या निवडणुकीत भाजपाच्या नरेंद्र पवार यांना आमदारकी मिळाली होती, मात्र यंदा हा मतदारसंघ युतीने शिवसेनेकडे सोपवला आहे. याठिकाणी यंदा सेनेचे विश्वनाथ भोईर आणि त्यांच्याविरुद्ध मनसेचे प्रकाश भोईर आणि काँग्रेसच्या कांचन कुलकर्णी यांची लढत असणार आहे. यापूर्वी मनसेचे उमेदवार भोईर यांनी 2009 मध्ये कल्याण पश्चिम येथून विजय मिळवला होता.

डोंबिवली विधानसभा मतदारसंघ 

डोंबिवली मतदारसंघ मागील दोन निवडणुकांपासून आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हातात आहे.यंदा सुद्धा भाजपाचे रवींद्र चव्हाण हे अधिकृत उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध मनसेचे मंदार हळवे आणि काँग्रेसच्या राधिका गुप्ते हे उमेदवार आहेत. हा मतदारसंघ एकाअर्थी चव्हाण यांचा बालेकिल्ला ओळखला जातो त्यामुळे याठिकाणी एक्तरफी लढत होणार की मनसे आणि काँग्रेस देखील तागडे आव्हान देतेय याबाबत उत्सुकता आहे.

मिरा -भाईंदर विधानसभा मतदारसंघ

यंदा मिरा -भाईंदर येथून भाजपाने विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांना उमेदवारी दिली आहे, तसेच काँग्रेसतर्फे मुझ्झफर हुसेन, आपचे नरेंद्र भगवानी, मनसेचे हरीश सुतार आणि अपक्ष म्ह्णून गीता जैन या उमेदवारांची लढत पाहायला मिळणार आहे. यापूर्वी 2009 मध्ये नरेंद्र मेहता यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना हरवले होते मात्र 2014 मध्ये मेहता यांनी तब्बल 32 हजाराहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता.

दरम्यान सध्या कार्यरत असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार आहे. 21 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करत निवडणूकीची तारिख जाहीर केली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे तर 24 ऑक्टोबरला मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.