मुंबईकरांचा ठाणे ते बोरिवली (Thane To Borivali) असा दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनीटांत पूर्ण होणार आहे. बहुप्रतिक्षित असलेला बोरिवली - ठाणे टनल (Thane Borivali Tunnel) रोड प्रोजेक्ट लवकरच सुरु होत आहे. हा प्रकल्प पूर्ण होताच बोगद्यातून होणाऱ्या प्रवासामुळे ठाणे ते बोरिवली अंतर अवघ्या 15 मिनीटांत होणार आहे. सांगितले जात आहे की, हा बोगदा राज्यातील सर्वात लांब बोगदा असणार आहे. 'एलएनटी' म्हणजेच 'लार्सन अँड टुब्रो' आणि 'मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड' या दोन कंपन्यांना हे काम मिळण्याची शक्यता आहे.
ठाणे बोरीवली या बोगद्यासंदर्भात सन 2015 मध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र, हा प्रकल्प पाठिमागील अनेक वर्षांपासून प्रलंबितच होता. आता मात्र हा प्रकल्प विनाविलंब सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. ठाणे-बोरिवली हा बोगदा साधारण 11.84 किमी इतक्या लांबीचा असणार आहे. प्रसारमध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा बोगदा दोन टप्प्यात असेल. त्यातील पहिला (जुळा ट्यूब रोड) बोरीवलीच्या दिशेने जाणारा 5.75 किमी लांब असेल ज्याच्या डिझाईनचे काम लार्सन अँड टुब्रो कंपनीला दिलं जाईल. तर दुसरा (जुळा ट्यूब रोड) 6.9 किमी लांबीच्या मेघा इंजिनिअरिंगकडे दिले जाईल. दोन्ही कंपन्या या बोगद्याच्या कामाचे डिजाईनही करणार आहेत. (हेही वाचा, आता बेस्टच्या बसमध्ये मोठ्या आवाजात फोनवर बोलण्यास मनाई; व्हिडीओ पाहण्यासाठी हेडफोनचा वापर अनिवार्य)
प्राप्त माहतीनुसार, ठाणे ते बोरीवली या थेट लिंकची लांबी 11.8 किमी इतका असणार आहे. सांगितले जात आहे की, या मार्गावर 3 + 3 अशा दुहेरी मार्गिका असणार आहेत. जमीनीखालून असणाऱ्या ग्राउंड टनलची लांबी 10.8 किमी आहे. आजघडीला घोडबंदर मार्गे ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी हे अंतर दोन तासांचे आहे. जे हा बोगदा झाल्यानंतर अवघ्या 15 मिनीटांत कापले जाईल. या बोगद्यासाठी साधार 8900 कोटी रुपये (अंदाजे) खर्च अपेक्षीत आहे.
वर्तमान स्थितीत जर बोरिवली-ठाणे प्रवास करायचा असेल तर त्यासाठी घोडबंदर हा एकच पर्याय आहे. हा रोड मिरा रोड ते ठाण्याचा पूर्व द्रुतगती महामार्ग असा आहे. हा प्रवास लांब आणि वेळखाऊ आहे. त्यातच रहदारीची समस्याही मोठी असल्याने प्रवासामध्ये अधिक वेळ खर्च होतो. नवा बोगदा तयार झाल्यास प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.