SOP For Covid-19 Management: महाराष्ट्रात 86 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद; एकूण संख्या 959, सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्वे

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड-19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून, त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

SOP For Covid-19 Management: महाराष्ट्रात 86 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद; एकूण संख्या 959, सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्वे
COVID 19 | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

भारतात पुन्हा एकदा कोविड-19 च्या (Covid-19) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये मंगळवार, 3 जून रोजी नवीन रुग्णांची नोंद झाली. पीटीआयनुसार, राज्य आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात 86 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 959 झाली आहे. एकूण रुग्णांपैकी 435 रुग्ण बरे झाले आहेत तर 510 रुग्णांवर सक्रिय उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात चार नवीन मृत्यूचीही नोंद झाली आहे, ज्यात नागपूरमध्ये दोन आणि चंद्रपूर आणि मिरजमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे. जानेवारी 2025 पासून 14 रुग्णांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

एकट्या मुंबईत 26 नवीन रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर पुण्यात 24, ठाण्यात 9 आणि नवी मुंबईत 6 रुग्ण आहेत. नवीन संसर्गाची नोंद झालेल्या इतर शहरांमध्ये कल्याण, उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, नागपूर, कोल्हापूर आणि सांगली यांचा समावेश आहे. वाढत्या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सोमवारी राज्यभरातील कोविड-19 व्यवस्थापनासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

राज्यात सध्या काही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत असून, सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड तपासणी व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. कोविड हा आजार विषाणूमुळे होणारा आजार आहे. सद्यस्थितीत कोविडसाठी राज्यात आयएलआय (इन्फ्लूएंझा सारखा आजार) आणि एसएआरआय (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण चालू आहे. त्या सर्वेक्षणामध्ये अशा रुग्णांची कोविडसाठी चाचणी केली जाते. रुग्ण कोविड पॉझीटीव्ह आढळल्यानंतर नियमित उपचार केले जात आहेत. राज्यात सध्या कोविड केसेस तुरळक आहेत.

निदान झालेल्या सर्व रुग्णांत सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. जानेवारी 2025 पासून आजपर्यंत सहव्याधीने ग्रस्त असलेले 9 व इतर 1 असे एकूण 10 रुग्ण दगावले आहेत. फ्लूसदृश्य आजार व एसएआरआय (तीव्र श्वसन दाह असलेले रुग्ण) यांचे आरोग्य विभागामार्फत नियमित सर्वेक्षण सुरू आहे. तसेच तीव्र श्वसनदाह असलेल्या सर्व रुग्णांचे कोविड-19 या आजारासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येते. तसेच फ्लू-सदृश आजार असलेल्या रुग्णांपैकी 5% रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. सर्व आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आलेले नमुने संपूर्ण जिनोम सिक्वेन्सिंगसाठी एन आय व्ही, पुणे व बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे व राज्यातील इतर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मनपा यांचे स्तरावर कोविड-19 साथरोग संदर्भात पूर्वतयारीचा आढावा विभागीय स्तरावर घेण्यात येत असून, त्यामध्ये सर्व यंत्रणेला रुग्णालये सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, आरटीपीसीआर चाचणी, ऑक्सीजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड व ऑक्सिजन उपलब्धतेबाबत सर्व तयारी ठेवण्यासंदर्भात जिल्ह्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी. (हेही वाचा: Bodybuilding Linked To Sudden Cardiac Deaths: पुरुष बॉडीबिल्डर्समध्ये वाढला अचानक हृदयविकाराचा धोका; समोर आली तणाव, स्टिरॉइड्ससह अनेक कारणे, जाणून घ्या काय सांगतो अभ्यास)

खोकताना व शिंकताना रूमालाचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सर्दी, ताप, खोकला, घसादुखी, धाप लागणे इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयास संपर्क साधून मोफत उपचार व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. अशा प्रकारची लक्षणे, इतर आजाराने व्याधिग्रस्त लोकांमध्ये आढळून आल्यास विशेष दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).