आज राज्यभरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होत असतानाच एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी या विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र भुयार हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु मतदानाच्या दिवशीच त्यांच्यावर सकाळी साडेपाच वाजता जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर जीवघेणा हल्ला तसेच गोळीबार झाला असल्याची बातमी समोर येत आहे. इतकेच नव्हे तर हल्लेखोरांनी त्यांची गाडीही पेटवली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना या घटनेची माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी साडेपाच वाजता गाडीतून बाहेर खेचून मारहाण केली. त्यावेळी मॉर्निंग वॉकला आलेल्या काही लोकांनी गोळीबाराचा आवाज आल्यानंतर देवेंद्र भुयार यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर हल्लेखोरांनी पेट्रोल ओतून देवेंद्र यांची गाडी पेटवली.’
अमरावती: मोर्शीत 'स्वाभिमानी'च्या उमेदवाराला मारहाण; कार पेटवलीhttps://t.co/3eDisUxq8w#MaharashtraAssemblyPolls #MaharashtraElections2019 #MaharashtraElections #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #Morshi pic.twitter.com/CiWtEqpAkM
— Maharashtra Times (@mataonline) October 21, 2019
या घटनेनंतर मोर्शी मतदारसंघात नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. राजू शेट्टी यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले. "संवेदनशील मतदारसंघ असताना पोलीस इतके बेफीकीर का राहिले? महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? असा थेट वक्तव्य त्यांनी केलं.
मोर्शी मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांची लढत कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्याशी आहे.