Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोनाचे संकट वावरत असताना राज्यातील पुणे (Pune) जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. यातच  हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील भारती विद्यापीठाच्या परिसरात घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्याने हॉटेलमध्येच गळफास लावून आपले जीवन संपवले आहे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, पोलिसांना मृतदेहाच्या बाजूला कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

संजय भरत सिनारे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय हा चाकण येथे कामाला असून आपल्या नातेवाईकांकडे राहायला होते. मात्र, लॉकडाऊनपूर्वी ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी चाकण पोलिसांत दाखल केली होती. परंतु, संजय हा भारती विद्यापीठाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या मोरया मिसळ हॉटेलमध्ये काम करत असल्याचे त्यांना समजले. शनिवारी रात्री मालक घरी गेल्यानंतर संजय हॉटेलमध्येच झोपला होता. परंतु, रविवारी सकाळी मालकाने हॉटेल उघडल्यानंतर संजयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची त्यांनी पाहिले. याबाबत हॉटेल मालकाने तातडीने चाकण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन संजयचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. हे देखील वाचा- मुंबई: सरकारी हॉस्पिटल मध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग करणाऱ्याला 30 वर्षीय वार्ड बॉयला अटक

पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. तर, दुसरीकडे आत्महत्येच्या घटेनेतही वाढ होऊ लागली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत अनेकांनी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.