State Ministers Foreign Tours: राज्यातील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर Aaditya Thackeray यांचा निशाणा; मंत्री Uday Samant यांच्या लंडन-म्युनिक-दावोस भेटीबाबत उपस्थित केले 'हे' प्रश्न
Aaditya Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर उद्धव ठाकरे सेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) निशाणा साधत आहेत. सर्वसामान्यांच्या पैशातून मंत्री परदेशात जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारच्या अधिकृत दौऱ्याचा भाग म्हणून सुट्टीच्या दिवशी जर्मनी आणि ब्रिटनला भेट देणार होते, ज्यात शिष्टमंडळाचा भाग म्हणून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. आता मुख्यमंत्र्यांनी आपला हा दौरा रद्द केला आहे. यासह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घानाच्या शिष्टमंडळाचा भाग असणार होते, मात्र त्यांनीही आपला दौरा रद्द केला आहे.

आता आदित्य ठाकरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या परदेश दौऱ्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरे यांनी सामंत यांचा 3 ऑक्टोबरपासून सुरु होणारा ब्रिटन, जर्मनी आणि स्वित्झर्लंडचा दावोस दौरा रद्द करण्याची मागणी केली.

आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडियावर सामंत यांच्यासाठी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरे विचारतात-

  • लंडन आणि म्युनिकमध्ये तुम्ही ज्या तथाकथित गोलमेज परिषदेत सहभागी व्हाल त्यात इतर कोण सहभागी असतील?
  • स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन नसतात तुम्ही कोणता ‘पाहणी दौरा’ करणार आहात? या दौऱ्याचा तिथल्या वाहतूक व्यवस्थापनाशी संबंध आहे का? तुम्ही दावोसचे पालकमंत्री आहात का?
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दावोसची बैठक जानेवारीमध्ये होणार आहे, तर मग तुम्ही आत्ता दावोसला जाऊन काय फायदा?

आदित्य ठाकरे पुढे म्हणतात, दावोसची ‘पाहणी भेट’ ही शुद्ध लबाडी आहे आणि मंत्र्यांनी करदात्यांच्या पैशावर होत असलेली त्यांची स्विस सुट्टी रद्द केली पाहिजे. राज्य सरकारकडे खर्च करण्यासाठी एवढा पैसा उपलब्ध असेल, तर शेतकऱ्यांना मदत का केली जात नाही? किंवा जुन्या पेन्शन योजनेवर का बोलत नाही? (हेही वाचा: Aaditya Thackeray यांची महाराष्ट्र भाजप, शिंदे गटाकडून होत असलेल्या 'आदु बाळ' उल्लेखावर पहिल्यांदा प्रतिक्रिया समोर)

महत्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ठाकरे यांनी फडणवीस यांच्या जपान दौऱ्याबाबतचा जीआर शेअर केला आहे. यामध्ये जपान सरकारच्या निमंत्रणावरून देवेंद्र फडणवीस यांनी जपानला भेट दिल्याचे म्हटले आहे. मात्र जपान सरकारच्या निमंत्रणानंतरही ही 5 दिवसांची सहल एमआयडीसीने प्रायोजित केली असल्याचेही जीआरमध्ये नमूद आहे. या जपान दौऱ्यातून नक्की काय सध्या झाले याची कोणतीही माहिती सरकारने दिली नसल्याचे ठाकरे यांचे म्हणणे आहे.

यासह ठाकरे म्हणतात, ‘स्पीकरने 5 दिवस रशियाला भेट दिली होती, या दौऱ्याचाचाही तपशील समोर आला नाही. उपसभापतींनी 49 लोकांसह युरोपला भेट दिली, परंतु या अभ्यास दौऱ्याच्या कोणत्याही परिणामांबद्दल कोणताही अहवाल मिळाला नाही. सीएम ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी 13 ते 27 ऑगस्ट दरम्यान ऑस्ट्रेलिया-न्युझीलंडचा दौरा केला पण हा दौरा कोणी प्रायोजित केला हे आम्हाला माहीत नाही. या दौऱ्यातून काय परिणाम साधले हे आम्हाला माहीत नाही.’