Coronavirus: विद्यापीठीय शैक्षणिक अंतिम वर्ष परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम; इतर राज्यांसोबतही चर्चा केली जाणार
Exams | (Image Used For Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com )

राज्यावर असलेले कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट पाहता विद्यापीठ अंतिम शैक्षणीक वर्षाच्या परीक्षा घ्यायला राज्य सरकार सद्यास्थितीत तरी तयार नसल्याचे दिसते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन समिती (Disaster Management Committee) यांच्यात मंत्रालयात आज दुपारी एक वाजता बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकार परीक्षा (Final Year Exams) न घेण्यावर ठाम असल्याचा निर्णय झाला. त्यामुळे कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या युजीसी आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष थांबण्याची चिन्हे तुर्तास तरी दिसत नाही.

या बैठकीत विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणं शक्य नाही. कोरोना संकट कमी झाल्यावर परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच, परीक्षा घेण्याबाबत देशातील इतरही विविध राज्यांची भूमिका काय आहे हेही चर्चेद्वारे जाणून घेतले जाईल, असे ठरले. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर पंजाब, ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली या राज्यांनीही विद्यापीठ अंतिम परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. दुसऱ्या बाजूला देशातील प्रमुख राज्यांनी विरोध केला असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने मात्र गेल्या आठवडय़ात सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (हेही वाचा, Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष; विद्यापीठ अंतिम परीक्षा होणार की नाही याबाबत उत्सुकता)

दरम्यान, राज्याचे उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, युजीसीने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का असा सवाल सामंत यांनी विचारला आहे.