पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात एक एसटी बस एका खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 200 फूट खोल असलेल्या दरीत कोसळलेली ही बस 30 फूटांवर एका झाडीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मटाने दिलेल्या वृत्तानुसार, या बसमध्ये बसचालकासह एकूण 58 प्रवासी होते. त्यातील 27 प्रवासी जखमी झाले असून त्यांना पोलादपूर जवळील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
ही घटना बुधवारी (30 ऑक्टोबर) रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. अक्कलकोट-महाड ही एसटी बस समोरुन येणा-या वाहनाला बाजू देत असताना बस 200 फूट दरी असलेल्या ठिकाणच्या एका संरक्षण कठड्याला धडकली. हा कठडा तुटून बस जवळपास 30 फुटांपर्यंत खाली घसरली. मात्र तेथील एका झाडीत ही बस अडकल्याने मोठा अनर्थ होता होता टळला. यात 27 प्रवासी जखमी झाले मात्र बस झाडीत अडकल्याने कोणीही दगावले नाही.
हेदेखील वाचा- आंबेनळी घाटाच्या लगत डोंगराचा भाग कोसळला, पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान वाहतूक बंद
जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वर्षभरापूर्वी आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाची बस कोसळून 30 जणांचा मृत्यू झाला होता. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरीत्या बचावले आणि या घटनेची माहिती त्यांनी सर्वांना कळवली होती.
या दुर्घटनेत मात्र त्या प्रवाशांचा मात्र 'काळ आलेला मात्र वेळ आली नव्हती' असेच म्हणावं लागेल. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.