सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड अशा ठिकाणी महापुराने (Flood) थैमान घातले होते. कोल्हापूर, सांगलीला तर तब्बल एक आठवडा पाण्याचा वेढा पडला होता. या काळात कित्येक संसार वाहून गेले, अनेकांचे घरे नष्ट झाली. आता पूरग्रस्त भागात मदत व पुनर्वसनासाठी 4 हजार 708 कोटी 25 लाख तर रुपये, तर कोकण, नाशिक आणि इतर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागासाठी 2 हजार 105 कोटी 67 लाख असे एकूण 6 हजार 913 कोटी 92 लाख रुपये सरकार खर्च करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल याबाबतची घोषणा केली.
काल राज्यमंत्रीपरिषदेची महत्वाची बैठक पार पडली त्यामध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. या मदतीमधून पूरग्रस्त भागात पूर्णतः नष्ट झालेली किंवा पूर्णतः पडझड झालेली घरे सरकार बांधून देणार आहे. घरांसोबतच अनेकांचे व्यापार, व्यवसायही या पुरामुळे पूर्णतः संपुष्टात आले. अशा व्यावसायिकांसाठी नुकसानाच्या 75 टक्के मदत दिली जाणार आहे. मृत जनावरांसाठी देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईबाबत पोलीस पाटील तसेच सरपंचांनी केलेला पंचनामा ग्राह्य धरण्यात येणार आहे. या सर्वांसाठी केंद्र सरकारकडे मदत मागण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट न पाहता आता राज्य सरकार आपल्या तिजोरीतून हा पैसा पुरवणार आहे.
निश्चित केलेली मदत –
- सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी - 300 कोटी
- मदतकाकार्य – 25 कोटी
- तात्पुरत्या निवारा केंद्रांतील नागरिकांसाठी – 27 कोटी
- स्वच्छता – 70 कोटी,
- पिकांची नुकसानभरपाई – 2088 कोटी
- जनावरांच्या जीवितहानीसाठी - 30 कोटी,
- मत्स्यव्यवसायिकांसाठी – 11 कोटी
- घरे दुरुस्तीसाठी – 222 कोटी,
- रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी - 876 कोटी
- सिंचन आणि जलसंपदा विभागाच्या कामांसाठी – 168 कोटी
- आरोग्यविषयक उपक्रम – 75 कोटी
- शाळांच्या इमारती आणि पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी- 125 कोटी
- छोट्या व्यावसायिकांच्या नुकसान - 300 कोटी
या मदतीचे योग्य पद्धतीने वाटप आणि पाहणीसाठी प्रत्येक मंत्र्याकडे एका तालुक्याची जबाबदारी दिली जाणार आहे. दरम्यान सरकार व्यतिरिक्त अनेक नागरिक, सामाजिक संथ, देवस्थाने, शैक्षणिक संस्था, चित्रपटसृष्टीमधील कलाकार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.