राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबई येथील निवास्थान सिल्वर ओक (Silver Oak Attack) या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू शकतो, असा अंदाज राज्याच्या गुप्तचर यंत्रणांना यापूर्वीच आला होता. महत्त्वाचे म्हणजे गुप्तचर यंत्रणांनी दिलेली माहिती मुंबई शहर सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे पाटील (Vishwas Nangre-Patil ) यांना घटना घडण्यापूर्वी चार दिवस मिळाली होती. तरीही त्यांनी काहीच हालचाल केली नाही. उलट या संपूर्ण प्रकारची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख नांगरे पाटील यांना सरकारने केले आहे. हे आक्षेपार्ह आहे. त्यांना तातडीने पदावरुन हटवायला हवे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी याबाबत राज्याच्या पोलीस विभागाला याबाबत माहितीही दिली होती. असे असूनही पोलिसांनी कोणत्याच प्रकारे आपली जबाबदारी योग्य पद्धतीने निभावली नाही. त्यामुळे विश्वास नागरे पाटील यांची चौकशी करावी व माहिती दडवून ठेवली म्हणून त्यांना निलंबित करावे, असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. ते अकोला येथील पत्रकार परिषदेत बुधवारी (13 एप्रिल) बोलत होते.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुढे म्हटले की, राज्य पोलिसांच्या विशेष शाखेचे अपल पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांनी केवळ शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला तसेच वर्षा हे शासकीय निवासस्थान, आझाद मैदान, मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह परिवहन मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान व वांद्रे येथील खासगी निवासस्थान या ठिकाणीही आंदोलक आक्रमपणे आंदोल करु शकतात, अशी शक्यता व्यक्त करणारे पत्र पोलिसांना लिहीले होते. हे पत्र कायदा व सुव्यस्था विभागाची जबाबदारी असलेले पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांना हे पत्र 4 एप्रिल रोजीच मिळाले होते. त्यामुळे संबंधित ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची आवश्यकता होती. मात्र, तसे घडले नाही, असे आंबेडकर म्हणाले. (हेही वाचा, Silver Oak Attack: गुप्तचर विभागाने सांगूनही पोलीस गाफील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची धक्कादायक माहिती)
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉलनुसार उद्धव ठाकरे यांना पोलीस सकाळ व संध्याकाळी दररोज गुप्तचर अहवाल देत असतात. त्यामुळे या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना देणे टाळले होते का? मुख्यमंत्र्यांना यांबाबत माहिती होती का? याबाबत सर्व खुलासा स्वत: मुख्यमंत्र्यांनीच करावा, असेही आंबेडकर यांनी या वेळी म्हटले.