Shivsena UBT Manifesto: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी सादर केला आपला जाहीरनामा; पहा कोणती आश्वासने दिली
Uddhav Thackeray | (Photo Credit: ANI)

Shivsena UBT Manifesto: उद्धव ठाकरे यांच्या 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा'ने नुकताच लोकसभा निवडणूक 2024 साठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. याला 'वचननामा' असे नाव देण्यात आले आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये हा वचननामा सादर करण्यात आला. भाजपसोबत युती असतानाही आमचा जाहीरनामा वेगळा यायचा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ते म्हणाले, सरकार कसे चालवायचे याबद्दल आमचे (इंडिया आघाडीचे इतर पक्ष काँग्रेस आणि एसएनपी शरदचंद्र पवार) यांचे स्वतःचे विचार आहेत. हा जाहीरनामा म्हणजे आर्थिक विकासापासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने केलेल्या आश्वासनांचा एक व्यापक संच आहे.

आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताने ते म्हणाले, 'आपला देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. हुकूमशाही संपवण्याची संधी मिळाली आहे. संपूर्ण राज्यावर केवळ एकाच व्यक्तीचा अधिकार असावा, असे होऊ नये. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे.' उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, 'मी गुजरातच्या विरोधात नाही मात्र महाराष्ट्राला लुटून गुजरातमध्ये पाठवले जात आहे हे थांबवले पाहिजे. आम्ही गुजरातचे काही ओरबाडून घेणार नाही. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर प्रत्येक राज्याचा मान ठेऊ, सर्व राज्यांचा आदर ठेऊ मात्र वित्तीय केंद्र नव्याने महाराष्ट्रात उभारू, ज्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात रोजगाराची संधी उपलब्ध होईल.' (हेही वाचा: Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन)

जाणून घ्या उद्धव ठाकरे यांच्या 'वचननामा' मधील महत्वाची आश्वासने- 

महाराष्ट्रात रोजगार

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या

सर्व जिल्ह्यांमध्ये रुग्णालये

औषधाअभावी रुग्णांच्या मृत्यूवर नियंत्रण

कंपन्यांनी विहित केलेले पीक विम्यामध्ये बदल

उद्योगासाठी चांगली व्यवस्था

इको-फ्रेंडली प्रकल्प

कर दहशतवाद समाप्त

जीएसटीमधील त्रासदायक अटी दूर करणे

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवणे

मुंबईत नवीन आर्थिक केंद्राची स्थापना

महिलांचा पुरुषांएवढ्याच सुविधा व संधी उपलब्ध करून देणार

सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलासांठी 50 टक्के जागा देणार, सुरक्षा देणार.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देऊ

उद्योग स्नेही वातावरण राज्यात निर्माण करू, पर्यावरण स्नेही उद्योग आणू

दरम्यान, महाविकास आघाडीत ठाकरे गट 21, शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 17 जागांवर लोकसभा लढणार आहे. शिवसेनेकडे दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, कल्याण, ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, परभणी, नाशिक, मावळ, धाराशिव, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम या जागा आल्या आहेत.