अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha) महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी सभा घेतली. यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शेतकऱ्यांवर आश्वासनांची अक्षरश: खैरात केली. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) देशात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक क्रांतिकारी योजनांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिले. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: दुसर्या टप्प्यातील मतदानाचा आज थांबणार प्रचार; 13 राज्यात 89 जागांवर 26 एप्रिलला मतदान)
पंतप्रधान मोदींनी गेल्या 10 वर्षात तुमचं कर्ज माफ केले नाही. पण आम्ही सत्तेत आल्यावर तुमचं कर्ज लगेच माफ करु. याशिवाय, देशात एका कृषी आयोगाची स्थापना केली जाईल. जेव्हा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज पडेल तेव्हा हा आयोग सरकारला कर्जमाफीची शिफारस करेल. त्यामुळे केवळ एकदाच नव्हे तर अनेकदा कर्जमाफी ही होऊ शकेल असे राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी अमरावतीमधील सभेत महालक्ष्मी योजनेची घोषणा केली. आम्ही प्रत्येक कुटुंबाची यादी तयार करणार आहोत. प्रत्येक कुटुंबातून एका महिलेची निवड केली जाईल. या महिलेच्या बँक खात्यात काँग्रेस पक्षाचं सरकार, इंडिया आघाडीचं सरकार प्रत्येक महिन्याला 8 हजार 500 रुपये या हिशेबाने वर्षाला प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा केले जातील, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.
राज्यात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये अमरावतीचा समावेश आहे. आज अमरावतीमधील प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी अमरावतीमध्ये राजकीय पक्षांनी प्रचारासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. अमरावतीमध्ये आज राहुल गांधी यांच्यासोबत अमित शाह यांचीही सभा होत आहे.