महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 1 आठवडा उलटला आहे, तरी राज्यात सत्ता स्थापन झाली नाही. शिवसेना आणि भाजप (shiv Sena-BJP) यांच्यामधील चर्चेचा अजूनही काहीच तोडगा निघाला नाही. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद यावर शिवसेना ठाम आहे, तर भाजप आपल्याकडील महत्वाची पदे सोडायला तयार नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठे विधान केले आहे. ‘शिवसेनेला अनेक नेत्यांनी पाठींबा दिला आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करता आले नाही, तर शिवसेना सरकार स्थापन करेल.’ असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांमध्ये काही खलबते चालली असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगत आहे.
ऐन हिवाळ्यात राज्यातील तापमान वाढले आहे. एकीकडे पक्षांमधील चर्चा तर दुसरीकडे राज्यातील आमदारांचा पाठींबा मिळवण्याची धडपड. अशा पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपशिवाय सत्ता स्थापन करू असे सांगितले आहे. शिवसेनाला पाठींबा देणारी अनेक पत्रे आमच्याकडे आहेत त्यामुळे भाजपने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्हाला सत्तास्थापनेसाठी भाजपची गरज नाही. शिवसेना सत्तेपासून केवळ एक पाऊल दूर आहे. असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस एकत्र आल्यास सत्ता स्थापन होणे अशक्यच: सुधीर मुनगंटीवार)
भाजप राज्यातील मोठा पक्ष आहे त्यामुळे 145 आकड्याचे बहुमत सिद्ध करण्यात त्यांना प्रथम संधी मिळेल, त्यांना जमले नाही तर, शिवसेना 145 चा आकडा सिद्ध करेल. आम्हाला अनेकांनी पाठींबा दिला आहे, त्यामुळे आमची सत्ता स्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. ही पाठिंब्याची पत्रे राज्यपालांना दाखवून शिवसेना पुढील हालचाली करेल. असे संजय राऊत म्हणाले आहेत.