सुधीर मुनगंटीवार (Photo Credits-ANI)

महाराष्ट्रात विधासनभा निवडणूकीनंतर सत्ता स्थापनेचा वाद भाजप-शिवसेना मध्ये अद्याप कायम आहे. त्यामुळे नवे सरकार कोणाचे स्थापन होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेला मुख्यमंत्री पद हवे असल्याच्या गोष्टीवर अडून बसल्याने भाजपसोबत सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस (Congress) आणि शिवसेना (Shiv Sena) कधीच एकत्र येणार नाही. तसेच एकत्र आल्यास सत्ता स्थापन करणे अशक्यच असल्याचे भाजपनेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी म्हटले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 6 नोव्हेंबरला नव्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर मित्रपक्षांसोबत महायुतीची सत्ता स्थापन होईल. तसेच शिवसेनेसोबत मिळून सत्ता स्थापन करणार असल्याची आशा आम्हाला आहे असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.('भाजपकडून राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणे म्हणजे हा लोकशाहीचा अपमान आहे'- संजय राऊत)

दुसऱ्या बाजूला काँग्रेस शिवसेनेला सत्ता स्थापनासाठी पाठिंबा देण्यासाठी उत्सुक आहे. तसेच शिवसेना एकट्याने सत्ता स्थापन करु शकते असे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राउत यांनी विधान केले आहे. राउत यांच्या विधानावर मुनगंटीवार यांनी कोणत्याही पक्षाने प्रयत्न करुन ही सरकार स्थापन होऊ शकत नाही असे म्हटले आहे. तर नुकत्याच मुनंटीवार यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट येत्या 9 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येईल असे विधान केले. त्यावर शिवसेने राष्ट्रपती तुमच्या खिशातले आहेत का असा सवाल करत टीका केली आहे.