Sanjay Raut (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजप- शिवसेना (BJP-ShivSena) पक्षात राजकीय वाद पेटला आहे. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाले असून मुख्यमंत्री पदावरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीकेचा वर्षाव करीत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी राष्ट्रपाती राजवटीची भाष्य केले आहे, असा आरोप शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sajay Raut) यांनी केला आहे. तसेच भाजपकडून राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणे म्हणजे हा लोकशाहीचा अपमान आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी विलंब होणे ही काही मोठी बाब नाही. मात्र सत्ताधारी पक्षाचे मंत्री राजवटीचा इशारा देत आहेत याला काय अर्थ आहे? असा प्रश्नही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अनेक दिवस उलटले तरी राज्यात सरकार स्थापन झाली नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यामुळे त्यावेळी त्यांना कोणत्याच अडचणी निर्माण झाल्या नव्हत्या. परंतु, या निवडणुकीत भाजपला अधिक जागा मिळाल्या आहेत, तरीदेखील राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी त्यांना शिवसेनेची गरज भासत आहे. यावेळी मुख्यमंत्री आमचाच अशी भुमिका दोन्ही पक्षाने घेतली असून युतीत वाद निर्माण झाला आहे. यातच सत्ता स्थापन करण्यासाठी एक विशिष्ट कालावधी असतो. या कालावधीत सत्ता स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवटी लागू करण्यात येईल असे मुनगंटीवार म्हणाले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

एएनआयचे ट्विट-

संजय राऊत काय म्हणाले?

अखेरच्या क्षणापर्यंत शिवसेना युतीधर्माचा पालन करणार. सध्या राज्यात शेतकऱ्यांचेही प्रश्न महत्त्वाचे आहेत. मात्र, सरकार स्थापन झालेले नाही. अशात योग्य कालावाधीत सरकार स्थापन झाले नाही तर, राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल असा इशारा देण्यात येतो आहे. सरकारमधील मंत्री अशा प्रकारे भाषा करत आहेत ही बाब म्हणजे लोकशाहीचा अपमान आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

एका वृत्तानुसार, या संदर्भात रावसाहेब दानवे यांच्याशी चर्चा केली असता, राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंबंधी कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही. सत्तास्थापनेसाठी एक विशिष्ट कालावधी असतो. या कालावधीत सरकार स्थापन होऊ शकले नाही तर काय पर्याय उरतो? तोच पर्याय सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला. त्यामध्ये धमकी किंवा इशारा असे काहीही नाही, असे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.