पुणे (Pune) शहरातील वाहतूक कोंडीला तोंड देणे तसेच हिंजवडीच्या आयटी हबला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडण्यासाठी, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो (Shivajinagar-Hinjawadi Metro), म्हणजेच पुणे मेट्रो लाइन 3 हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लाईनचे काम 90% पूर्ण झाले आहे आणि ते अंतिम टप्प्यात आले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हिंजवडी औद्योगिक क्षेत्राच्या विकासाबाबत चर्चा करण्यासाठी एक बैठक झाली.
बैठकीत पुणे मेट्रो लाईन 3 ची प्रगती, नवीन रस्ते प्रकल्प, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि विकास प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. मार्च महिन्याच्या सुरुवातीला, मान-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ प्रकल्पासाठी आवश्यक असलेली सर्व जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ परिसरातील राजभवन कार्यालयाजवळ 263.78 चौरस मीटर जमीन आवश्यक होती. यासाठी नोव्हेंबर 2022 मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला होता. राजभवन कार्यालयाने या जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी दिल्यानंतर, आता मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक असलेली संपूर्ण जमीन उपलब्ध झाली आहे. (हेही वाचा: Punes Most Expensive Areas: पुण्यात घर खरेदी करताय? प्रभात रोड, एरंडवणे, मॉडेल कॉलनी ठरले शहरातील सर्वाधिक महागडे परिसर, जाणून घ्या दर)
ही मेट्रो लाइन हिंजवडी, वाकड, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगर या भागांना जोडेल, जिथे दररोज 3 लाखांहून अधिक आयटी कर्मचारी आणि रहिवासी प्रवास करतात. सध्या या मार्गावर वाहतूक कोंडी ही मोठी समस्या आहे. ही लाइन सिव्हिल कोर्ट येथे महामेट्रोच्या इतर मार्गांशी जोडली जाईल, ज्यामुळे पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होईल. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ, इंधन खर्च आणि प्रदूषण कमी होईल, आणि पुण्याच्या आयटी क्षेत्राला नवीन चालना मिळेल.
हिंजवडी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पीएमआरडीएची महत्त्वपूर्ण बैठक!
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हिंजवडी औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली. यात पुणे मेट्रोलाइन ३ च्या [1/3] pic.twitter.com/MECm7ozwx1
— PMRDA (@OfficialPMRDA) April 3, 2025
हा मेट्रो प्रकल्प 23.293 किमी लांबीचा आहे आणि तो सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविला जात आहे. या प्रकल्पाला सरकारने 9 फेब्रुवारी 2018 रोजी मान्यता दिली. या लाईन 3 मुळे केवळ दैनंदिन प्रवासात वाढ होणार नाही तर विकासाला चालना मिळेल आणि शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. यासह प्रवाशांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, महा मेट्रो आणि पीएमआरडीए सिव्हिल कोर्ट आणि शिवाजीनगर मेट्रो स्थानकांना जोडण्यासाठी फूट ओव्हरब्रिज (एफओबी) बांधण्यासाठीही चर्चा करत आहेत.