पुणे (Pune) हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते, आणि आज ते भारतातील काही सर्वात महागड्या निवासी क्षेत्रांचे ठिकाण बनले आहे. माहितीनुसार, रेडी रेकनर (RR) दरांमध्ये झालेल्या बदलांमुळे पुण्यातील जमीन आणि फ्लॅटच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या बदलांनुसार, प्रभात रोड हे पुण्यातील जमिनीच्या किमतींसाठी सर्वात महागडे ठिकाण ठरले आहे, जिथे दर सुमारे 86,710 रुपये प्रति चौरस मीटर इतके आहेत. हे क्षेत्र शहराच्या मध्यभागी असून शांत आणि हिरवेगार वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. दुसरीकडे, एरंडवणे हे फ्लॅटच्या किमतींसाठी अव्वल ठरले आहे.
रेडी रेकनर दरांच्या सुधारणेनंतर, प्रभात रोड आणि मॉडेल कॉलनी हे पुन्हा एकदा पुण्यातील सर्वाधिक जमिनीचे दर असलेल्या सर्वात महागड्या क्षेत्रांच्या यादीत अव्वल स्थानावर आले आहेत. अहवालानुसार, जमिनीच्या दरांवर आधारित सर्वात महागड्या क्षेत्रांमध्ये- प्रभात रोड, मॉडेल कॉलनी, एरंडवणे, घोरपडी आणि कोथरूड यांचा नंबर लागतो. नांदोशी आणि किरकटवाडी हे सर्वात स्वस्त क्षेत्र राहिले आहेत.
जमिनीचे दर सर्वाधिक असलेले परिसर-
मॉडेल कॉलनी- ₹67,490 प्रति चौरस मीटर (₹6,270 प्रति चौरस फूट)
एरंडवणे- ₹55,950 प्रति चौरस मीटर (₹5,198 प्रति चौरस फूट)
घोरपडी- ₹45,410 प्रति चौरस मीटर (₹4,219 प्रति चौरस फूट)
कोथरूड- ₹42,420 प्रति चौरस मीटर (₹3,941 प्रति चौरस फूट)
निवासी फ्लॅट प्रॉपर्टीच्या दरांचा विचार केला तर, एरंडवणे हे यादीत अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर कोरेगाव पार्क, प्रभात रोड, मॉडेल कॉलनी आणि कोथरूड यांचा क्रमांक लागतो. व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रात, जंगली महाराज रोड ते गरवारे आयलंड आणि डेक्कनमधील बालगंधर्व सभागृहापर्यंत पसरलेल्या परिसरात मालमत्तेचे दर प्रति चौरस मीटर ₹1,30,850 आहेत, जे प्रति चौरस फूट ₹12,157 इतके आहेत. (हेही वाचा: New Ready Reckoner Rates in Maharashtra: महाराष्ट्रात मालमत्ता खरेदी करणे झाले महाग; रेडी रेकनर दरात सरासरी 4.39 टक्के वाढ)
पुण्यातील निवासी अपार्टमेंटच्या किमती:
कोरेगाव पार्क- ₹1,79,490 प्रति चौरस मीटर
प्रभात रोड- ₹1,65,220 प्रति चौरस मीटर
मॉडेल कॉलनी- ₹1,46,190 प्रति चौरस मीटर
कोथरूड- ₹1,21,540 प्रति चौरस मीटर
दरम्यान, महाराष्ट्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनर (RR) दरांमध्ये वाढ जाहीर केल्यामुळे, घर खरेदी करू इच्छिणाऱ्या पुणेकरांना आता काही भागात जास्त किमतींचा सामना करावा लागेल. नवीन दर 1 एप्रिल 2025 पासून लागू झाले, ज्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मालमत्तेच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. संपूर्ण राज्यात रेडी रेकनर दरांमध्ये सरासरी 4.39% वाढ करण्यात आली आहे, ज्यामध्ये पुण्यात 4.16% आणि पिंपरी चिंचवडमध्ये 6.69% वाढ झाली आहे. या बदलाचा अर्थ असा आहे की घर खरेदीदारांना मालमत्ता व्यवहारांसाठी जास्त पैसे द्यावे लागतील, ज्यामुळे या प्रदेशातील खरेदीदार आणि विक्रेते दोघांवरही परिणाम होईल.