Shiv Sena: रक्तदान करणाऱ्या नागरिकांसाठी शिवसेनेची भन्नाट ऑफर; मांसाहारींना मिळणार एक किलो कोंबडीचे मांस, तर शाकाहारींना पनीर
Shiv Sena | (Photo Credits-ANI)

रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, असे म्हटले जाते. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची एक संधी रक्तदानातून आपल्याला मिळते. समाजाचा घटक या नात्याने आपण सर्वांनी रक्तदान करणे काळाची आहे. दरम्यान, राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक समाजसेवक, संस्था आणि राजकीय नेते रक्तदान शिबिरांचे (Blood Donation Camp) आयोजन करतात. याचपार्श्वभूमीवर शिवसेनेने (Shiv Sena) प्रभादेवी (Prabhadevi) येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. तसेच रक्तदान करणाऱ्या नागरिकांसाठी शिवसेनेने भन्नाट ऑफर दिली आहे. दरम्यान, रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना एक किलो कोंबडीचे मांस तर, शाकाहारींना पनीर देण्यात येणार आहे. शिवसेनेची ही ऑफर आता चर्चेचा विषय ठरत आहे.

शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी माहीम- वरळी विधानसभा क्षेत्रात 13 डिसेंबर रोजी महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे रक्तदान शिबीर न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात पार पडणार आहे. रक्तदान शिबिरांचे आयोजन करणाऱ्या मंडळींनी नागरिकांच्या मनातील भीती ओळखून रक्तदान करणाऱ्यास भेटवस्तू देण्याचे आमीष दाखविण्यास सुरुवात केली आहे. भेटवस्तूच्या निमित्ताने रक्तदाते मिळतील असे आयोजकांना वाटत आहे. महत्वाचे म्हणजे, या शिबिरात रक्तदान करण्यासाठी नागरिकांना प्रभादेवी येथील शिवसेना शाखा क्रमांक 194 मध्ये 11 डिसेंबरपूर्वी नाव नोंदणी करावी लागणार आहे. हे देखील वाचा- Maharashtra MLC Election 2020 Results: शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता न आल्याबद्दल त्यांनी विचार करावा, रावसाहेब दानवे यांची निवडणूकीच्या निकालानंतर प्रतिक्रिया

रक्तदान कोणी करावे?

- रक्तदात्याचे वजन 45 किलोपेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

- रक्तदात्यांच्या रक्तामधील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमीत कमी 12.5 ग्रम असायला हवे.

- रक्तदात्यांनी पूर्णपणे निरोगी असणे महत्वाचे आहे.

- दर 3 महिन्यानंतर रक्तदान करता येते.

- वयाच्या 18 व्या वर्षापासून तर, 65 वयोगटातील नागरिकांना रक्तदान करता येते.

रक्तदान कोणी करू नये?

- रक्तदात्यांनी मागच्या 3 दिवसांत कोणतेही पतिजैविक औषध घेतलेले नसावे.

- रक्तदात्यांना मागील एका वर्षात विषमज्वर, काविळ किंवा श्वानदंश झालेला नसावा. तसेच त्याने रेबीजची लस घेतलेली नसावी.

- रक्तदात्यांची गेल्या सहा महिन्यात कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसावी.

- गर्भवती महिला, महिलेला 1 वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा संबंधित महिलेचा 6 महिन्यात गर्भपात झालेला नसावा.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला लगेच प्रमाणपत्र व कार्ड दिले जाते. या कार्डावर रक्तदात्यास किंवा त्याच्या परिवारापैकी कुणालाही रक्ताची गरज असल्यास रक्तपेढीतर्फे एक युनिट रक्त मोफत दिले जाते.