#MeTooमोहिमेअंतर्गत अनेक महिला लैंगिक गैरवर्तनाबाबतचे अनुभव व्यक्त करत आहे. दरम्यान, ही मोहीम जोर धरत असतानाच समाजातून या मोहिमेवर जोरदार टीकाही होताना दिसत आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी तर, #MeToo ही मोहीम सुशिक्षित महिलांसाठी हत्यार ठरत असल्याचे म्हटले आहे. #MeTooमुळे महिलांना नोकरी मिळण्याच्या प्रमाणात घट होईल. तसेच, एखादी महिला भविष्यात पाच-सहा वर्षांनंतर तक्रार करेल, या भीतीमुळेही महिलांना नोकरी मिळण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे.
'मला #MeTooची भीतीच वाटते'
औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महिलांविषयक कायदे यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार शिरसाट बोलत होते. हा कार्यक्रम राज्य महिला आयोग आणि समाजसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. स्वत:ला सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या महिलांसाठी #MeToo एक हत्यार ठरु पाहात आहे. मला तर #MeTooचा अर्थच कळला नाही. मला #MeTooची भीतीच वाटते असेही शरसाट यांनी या वेळी सांगितले. (हेही वाचा,#MeToo: माझ्यावरील आरोपांबाबत लवकरच बोलेन - एम जे अकबर)
'साडी घेतली नाही म्हणून नवऱ्याला #MeToo म्हणणार का?'
दरम्यान, ग्रामिण भागातील महिलांचे शोषण होते. मात्र, त्यांना #MeTooबाबत माहिती नसल्यामुळे अशी प्रकरणे पुढे येत नाहीत. #MeToo मोहिमांमुळे महिलांचे सक्षमीकरण होत नाही. उलट झालेच तर नुकसानच होते. मुलांचा सांभाळ, त्यांच्यावरचे चांगले संस्कार आणि संसाराचा गाडा सुरळीत ठेवणे ही जबाबदारी प्रामुख्याने महिलांची असते. पण, आता काळ बदलला. कोणती महिला काय आरोप करेल याचा नेम नाही. आता समजा एखाद्या पतीने साडी घेतली नाही. तर,विवाहीत महिला पतीविरोधात #MeToo म्हणणार का?, अशी उपहासात्मक टीकाही शिरसाट यांनी या वेळी केली.