#MeToo: माझ्यावरील आरोपांबाबत लवकरच बोलेन - एम जे अकबर
#MeToo: केंद्रीय राज्यमंत्री एम जे अकबर (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांचे विदेश दौऱ्याहून भारतात आगमन झाले. अकबर यांचे विमानतळावर आगमन होताच प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, माझ्यावर झालेल्या आरोपांबाबत मी लवकरच प्रतिक्रिया देईन, असे त्यांनी सांगितले. #MeToo मोहिमेअंतर्गत महिलांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यानंतर अकबर यांच्यासह केंद्र सरकार आणि भाजपवरही टीका होत आहे. या पार्श्वभूमिवर आपण राजीनामा देणार का? असे विचारले असता अकबर यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. विशेष म्हणजे #MeToo मोहिमेअंतर्गत अकबर यांच्यावर तब्बल ९ महिलांनी लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहेत.

लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे मंत्री अकबर आणि पर्यायाने सरकारसह भाजपवरही दबाव वाढला आहे. अकबर यांच्यावरील सर्व आरोप जुने आहेत. अकबर हे पत्रकारीतेत वेगवेगळ्या संस्थांसोबत काम करत असल्यापासून त्यांच्यावर हे आरोप होत आले आहेत. त्यामुळे अकबर यांचा बचाव करणे पक्षासाठीही अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे अकबर यांच्यावरील आरोपावर मौन बाळगणाऱ्या भाजपला अखेर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल असे म्हटले आहे.(हेही वाचा: #MeToo: एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांची 'शाहा'निशा होणार!)

एम जे अकबर हे माजी पत्रकार आणि विद्यमान केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यांच्यावरील आरोपांबाबत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनीही मौन बाळगले होते. दरम्यान, मौन सोडत शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.