#MeToo: एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपांची 'शाहा'निशा होणार!
#MeeToo: केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप (संग्रिहत प्रतिमा)

#MeToo मोहिमेंतर्गत अनेक महिलांनी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप लावले आहेत. या आरोपांवर केंद्र सरकार आणि भाजप यांची भूमिका काय? याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, या आरोपांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी दखल घेतली असून, 'एम जे अकबर यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल', असे म्हटले आहे. एम जे अकबर हे माजी पत्रकार आणि विद्यमान केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यांच्यावरील आरोपांबाबत पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनीही मौन बाळगले होते. दरम्यान, मौन सोडत शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एम जे अकबर यांच्यावरील आरोप प्रकरणात अमित शाह यांच्या वक्तव्याच्या रुपात आलेही ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता 'एम. जे. अकबर यांनीच या विषयावर मौन सोडावं आणि आरोपांना उत्तर द्यावं ', असं सांगत चेंडू अकबर यांच्याच कोर्टात टोलवला होता.

दरम्यान, अकबर काम करत असताना त्यांना विरोध करुन नोकरी सोडलेल्या महिला पत्रकार पुढे आल्या आहेत. मात्र, ज्यांनी व्यक्त होण्याची हिंमत आली नसलेल्या इतरही अनेक महिला गप्प असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर, काँग्रेसनेही भाजपवर दबाव टाकत लैंगिक शोषणाचे आरोप असलेली व्यक्ती मंत्रीपदावर कशी राहू शकते?, असा सवाल विचारला आहे.