Nihar Thackeray on Shiv Sena & CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन पुढे जात आहेत- निहार ठाकरे
Nihar Thackeray with Eknath Shinde (Photo Credit - Twitter)

शिवसेना (Shiv Sena) पक्षात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुदध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट असा सामना रंगला असतानाच आता ठाकरे विरुद्ध ठाकरे सामना पुन्हा रंगणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत पूत्र आणि उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू बिंदुमाधव ठाकरे (Bindumadhav Thackeray) यांचे चिरंजीव निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी आता शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निहार ठाकरे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना निहार ठाकरे म्हणाले की, आपण सक्रीय राजकारणात सहभागी झालो नाही. केवळ एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो.

निहार ठाकरे यांनी सांगितले की, आपली एक 'लॉ फर्म' आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना आवश्यक ती कायदेशीर लढाई लढण्यासाठी सर्व मदत देण्याच्या भावनेतून मी त्यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे हे आपला माणूस आहेत. ते बाळासाहे ठाकरे यांचा विचार पुढे घेऊन जात आहेत. त्यामुळे त्यांना सर्व प्रकारची कायदेशीर मदत करण्यासाठी आपण त्यांची सदिच्छा भेट घेतली. ते शिवसेनेचे आहेत. आपण सर्वच जण शिवसेनेचे आहोत. त्यामुळे त्यात भेद करण्याची आवश्यकता नाही. अनेक गोष्टी न्यायालयात प्रलंबित आहेत. मी स्वत:ही एक वकिल आहे. त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करणार नाही, असे निहार ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: 'ते शिवसैनिक नव्हे, तर दगाबाज मुख्यमंत्री', एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे बरसले)

दरम्यान, एकनाथ शिंदे आण उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्षावर विचारले असता स्पष्ट उत्तर देणे निहार ठाकरे यांनी टाळले. मात्र, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन पुढे जात असल्याचे निहार ठाकरे म्हणाले. निहार ठाकरे यांच्या आगोदर स्मीता ठाकरे यांनीही एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.