
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंड करुन सत्तांतर कल्यानंतर शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट जोरदार आक्रमक झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी कंबर कसली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठिकठिकाणी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते शिवसैनिक नव्हेत तर दगाबाज मुख्यमंत्री असल्याची घणाघाती टीका उद्धव यांनी शिंदे यांच्यावर केली. या लोकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हवा. परंतू, त्यांचा मुलगा नको आहे, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र डागले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपले टीकास्त्र कायम ठेवत म्हटले की, भाजपला शिवसेना संपवायची होती. त्यामुळे दगाबाजांना हाताला धरुन त्यांनी हे प्रयत्न सुर केले. त्यामुळे ते शिवसैनिक नाहीत तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत, असे ठाकरे म्हणाले. आमच्या खांद्यावर पाय ठेऊनच त्यांनी दिल्ली गाठली आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपले टीकास्त्र कायम ठेवले. (हेही वाचा, Abdul Sattar On Shiv Sena: काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदारही शिंदे गटाच्या संपर्कात, खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच; अब्दुल सत्तार यांचा दावा)
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी भविष्यात शिवसेना पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे संकेत दिले असून, त्यात महत्त्वपूर्ण बदल करण्याचेही संकेत दिले आहेत. बंडखोरांनी शिवसेनेत बंड केले असले तरी, शिवसेनेकडे नव्याने आकृष्ट होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढते आहे. प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच, इतरही अनेक विविध क्षेत्रातील लोक शिवसेनेत दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.