Chhaava Poster| @Maddock Films/ Instagram

लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित छावा (Chhaava) सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. 14 फेब्रुवारीला रीलीज झालेल्या या सिनेमाने जवळपास 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या सिनेमामध्ये त्यांचा जीवनपट दाखवण्यात आला आहे. पण सिनेमाच्या क्लायमॅक्स मध्ये संगमेश्वर जवळ त्यांचे मेहुणे गणोजी आणि कान्होजी शिर्के यांच्या फितुरीमुळेच ते पकडले गेल्याचं दाखवण्यात आलं आहे. यावरून सध्या शिर्के वंशजांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

शिर्के वंशजांचा नेमका आक्षेप कशावर?

लक्ष्मण उत्तेकरांचा 'छावा' सिनेमा शिवाजी सावंत लिखित 'छावा' याच कादंबरीवर आधारित आहेत. पुस्तकामध्ये शिर्के बंधूंच्या फितुरीने औरंगजेबाच्या तावडीत संभाजी महाराज सापडल्याचा उल्लेख आहे. परंतू शिर्केंच्या वंशजांच्या दाव्यानुसार असा इतिहासामध्ये पुरावा नाही. “पूर्वी इतिहासातील गोष्टी विशिष्ट वाचकांपुरता मर्यादित होत्या. आता सोशल मीडियाच्या प्रसारामुळे चुकीची माहिती वेगाने पसरते. लोक विचार केल्याशिवाय या कथांचा वापर करतात; ज्यामुळे शिर्के कुटुंबाबद्दल चुकीचा संशय निर्माण होतो,” असे दीपक राजे शिर्के यांनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला सांगितले आहे. ‘छावा’ चित्रपटाने इतिहासाचे विकृतीकरण करून, आपल्या पूर्वजांना बदनाम केल्याचा आरोप शिर्के कुटुंबीयांनी केला आहे.

'लोकमत' ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्येही रामकृष्ण शिर्के यांनी शिर्के घराणं स्वराज्याला एकनिष्ठ होते. सिनेमातील काही दृष्यांमुळे आमची बदनामी होत आहे. दरम्यान शिर्केंनी फितुरी केल्याचे पुरावे पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन कार्यालयात उपलब्ध नसल्याचं 2009 मध्येच सांगण्यात आले आहे. त्यामुळे 'छावा' चित्रपटाचे लेखक, पटकथा लेखक, संवाद लेखकावर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी सातारा येथील सुहासराजे शिर्के यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस महासंचालकांकडे केल्याची माहिती रामकृष्ण शिर्के यांनी दिली आहे.

कोण होते गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के?

गणोजी व कान्होजी हे पिलाजी शिर्के यांचे पुत्र होते. पिलाजी यांची मुलगी येसूबाई यांचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांशी; तर गणोजी यांचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या राजकुंवर यांच्याशी झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पिलाजींना जमीन देण्याबाबतचे वचन दिले होते, असा दावा करून शिर्के बंधूंनी छत्रपती संभाजी महाराजांकडे जमीन मागितल्याचे सिनेमात दाखवण्यात आले आहे. संभाजी महाराजांनी शिर्के बंधूंच्या मागणीकडे लक्ष न दिल्याने त्यांनी संभाजी महाराजांची फितुरी मुघलांकडे केली.

संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराज पकडले तेव्हा तेथे गणोजी आणि कान्होजी शिर्केही उपस्थित असल्याचे चित्रपटात दाखविण्यात आले आहे. दरम्यान दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी शिर्के कुटुंबियांची माफी देखील मागितली आहे मात्र शिर्के वंशजांकडून आता माफीनाम्यानंतरही मानहानीच्या खटल्याची तयारी सुरू आहे.