Maharashtra Assembly Elections 2019: शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची 17 सप्टेंबर पासून सुरुवात; सोलापूर मधून करणार नांदी, 'असा' असेल प्लॅन
Nationalist Congress Party chief Sharad Pawa | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election) अवघ्या महिन्यावर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाची ढासळती बाजू सावरण्यासाठी आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी पारंपरिक पवित्रा हाती घेण्याची ठरवले आहे. यानुसार येत्या मंगळवारी म्हणजेच 17  सप्टेंबर पासून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचा राज्यव्यापी दौरा सुरु होणार आहे. याबाबत पक्षाच्या ट्विटरवरून अधिकृत माहिती देत या दौऱ्याचा प्लॅन सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, 17 तारखेला सोलापूर (Solapur) येथून दौऱ्याची नांदी होणार असून संपूर्ण आठवडाभर बीड, परभणी, जालना या ठिकाणी सभा घेतल्या जातील. 22सप्टेंबर रोजी सातारा येथे बैठकीनंतर या दौऱ्याचा समारोप होणार आहे.

शरद पवार यांनी एकेकाळी लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या माढा मतदारसंघातून यंदा त्यांना पक्षांतर्गत क्लेशामुळे माघार घ्यावी लागली होती. या राज्यव्यापी दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सोलापुरात जाहीर सभा घेऊन पक्षाचे पदाधिकारी व जनतेसोबत पवार संवाद साधणार आहेत. यानंतर पहिल्या टप्प्यात सोलापूर, उस्मानाबाद, बीड लातूर, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सभा घेतल्या जातील.

(हे ही वाचा -सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीसाठी कॉंग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आघाडीवर; उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर पुन्हा निवडणूक)

राष्ट्रवादी काँग्रेस ट्विट

दरम्यान, विधानसभा पूर्व काळात पक्षांतराचे अनेक प्रसंग सातत्याने समोर येत आहेत, याचा सर्वात मोठा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. . साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिल्ली येथे भाजपा प्रवेश घेतल्याने सातारा मतदारसंघ आता राष्ट्रवादीसमोरील मोठे आवाहन ठरू शकतो. अशावेळी पडती बाजू सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व अनुभवी नेते शरद पवार यांनी स्वतः पुढे येणे निवडले आहे.