Sharad Pawar | (Photo Credits: twitter)

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांना रविवारी मुंबईतील पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दिलीपकुमार यांना श्वास घेण्यास अडचण निर्माण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बातमी सार्वजनिक होताच त्यांच्या चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील तसेच देशभरातील नामांकित व्यक्तींनीही अभिनेत्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) दिलीप कुमार यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. रविवारी दुपारी अभिनेत्याला भेटण्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. शरद पवार हिंदुजा हॉस्पिटलमधून बाहेर पडल्याचे फोटो समोर आले आहे.

याबाबत शरद पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे की, ‘खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ अभिनेते श्री दिलीप कुमारजी यांची आज भेट घेतली. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती सायरा बानो यांच्याकडून दिलीप कुमार यांचे आरोग्य आणि उपचाराबाबत माहिती घेतली. श्री दिलीपकुमारजी यांना त्वरित उत्तम आरोग्य लाभी, अशी माझी इच्छा आहे.

दिलीप साहेबांच्या बाबत माहिती देताना त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक ट्विट केले गेले. ज्यामध्ये असे लिहिले होते की, 'दिलीप साहेबांना रुटीन तपासणीसाठी नॉन-कोविड पीडी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यात त्रास होत होता. नितीन गोखले यांची टीम रूग्णालयात त्यांची काळजी घेत आहे. सायरा बानो यांनी लोकांना आवाहन केले आहे की, कृपया दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करत रहा आणि तुम्हीही सुरक्षित राहा.'

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना Bilateral Pleural Effusion चे निदान झाले आहे. सध्या त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुंबईच्या पीडी हिंदुजा हॉस्पिटलमधील अभिनेत्यावर उपचार करणारे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, गेल्या वर्षी दिलीपकुमार यांनी त्यांचे दोन धाकटे भाऊ असलम खान (88) आणि एहसान खान (90) यांना कोरोना संसर्गामुळे गमावले.