
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) गव्हर्नरपदी शक्तिकांत दास (Shashikant Das) यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र दास यांची नेमणुक ही चुकीची असल्याच्या टीका करण्यात आल्या असून सामनाच्या आजच्या अग्रलेखातून ही त्यांच्यवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला सत्य सांगणारे लोक हवे नसून फक्त होयबा करणारे लोक हवे आहेत असे म्हटले आहे. तसेच दास यांची नेमणूक ही दहशतवादाची सुरुवात असे म्हटले आहे. सुब्रमण्यम स्वामींनी ही दास यांच्यावर आरोप करत त्यांना लक्ष केले असून दास यांना सर्वोच्च शिखरावर बसवले जात असल्याचे सांगितले आहे.
सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे
-रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी मोदी सरकारने आपला माणूस चिकटवला आहे. निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ही पदे व्यक्तिगत लोभ व राजकीय स्वार्थापासून लांब ठेवावीत, असे संकेत आहेत.
-मोदी किंवा जेटली यांनी स्वतःचा माणूस नेमायला हरकत नाही. पण या महान आर्थिक शिखर संस्थेवरून देशाच्या आर्थिक कारभारावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता त्या माणसात आहे काय? असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे.
-श्री. दास हे अर्थशास्त्राचे अभ्यासक नाहीत. ते आय.ए.एस. म्हणजे नागरी सेवेत होते व मोदी यांच्या सर्वच बऱ्यावाईट आर्थिक धोरणांचे टाळ्या वाजवून समर्थन करणारे म्हणून ते ओळखले जातात.
-दास हे इतिहासाचे अभ्यासक आणि पदवीधर आहेत. रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी अर्थतज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अनेक मान्यवर संस्थांतून काम केले व त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रतिष्ठा मिळाली.
-सरकारला सत्य सांगणारे लोक नकोत व होयबा हवेत. शक्तिकांत दास यांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी नेमणूक त्याच हेतूने झाली असेल तर ही आर्थिक दहशतवादाची सुरुवात आहे.
-शक्तिकांत दास यांची नेमणूक म्हणजे रिझर्व्ह बँकेतील ‘गंमत’ आणि अर्थव्यवस्थेशी ‘खेळ’ व्हायला नको. श्री. दास हे राजकारण्यांशी चांगले संबंध ठेवून आहेत. येथे प्रश्न महागाई व अर्थव्यवस्थेचा आहे. राजकारण्यांनी निर्माण केलेली ही भुताटकी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर कशी आटोक्यात आणणार?
-दास यांच्यापुढील मुख्य आव्हान हे आहे की रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता सुरक्षित आहे हे जगातील गुंतवणूकदारांना दाखवून द्यावे लागेल.
-राजकीय हस्तक्षेप झाला. हा हस्तक्षेप असह्य झाला तेव्हा रघुराम व उर्जित पटेल निघून गेले व हस्तक्षेप सहन करणारे ‘दास’ आणले ही भावना धोकादायक आहे.
दास यांच्या नियुक्तीवरुन विविध पद्धतीने टीका केली जात आहे. त्यामुळे गव्हर्नपदी केलेली नियुक्ती ही चुकीची असल्याचे राजकरण सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.