मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूक बटाटाचा मुलगा शादाबला अटक, NCB ची कारवाई
Shadab Batata (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर मुंबईत पसरलेले ड्रग्ज रॅकेट (Drugs Racket) प्रकर्षाने समोर आले. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) ठिकठिकाणी छापेमारी सुरुच आहे. दरम्यान काल (25 मार्च) रोजी मुंबईत अनेक ठिकाणी NCB ने छापेमारी केली. या छापेमारीत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारूक बटाटा (Farookh Batata) याचा मुलगा शादाबला (Shadab Batata)अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. इतकच नव्हे तर त्याच्याकडून 2 कोटींपेक्षा अधिक ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले आहे. NCB च्या टीमचे हे सर्वात मोठे यश आहे. शादाबच्या माध्यमातून पोलिसांना फारूक बटाटापर्यंत पोहोचता येईल.

शादाबचे वडिल फारूक बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर असल्यामुळे शादाबकडून देखील मुंबईतील त्याचे इतर ठिकाणे आणि अन्य महत्त्वाची माहिती मिळू शकते. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे गेल्या अनेक दिवसांपासून शादाब बटाटा मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या व्यवसायात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती.हेदेखील वाचा- मुंबईच्या डोंगरी आणि नागपाडा भागात NCB चा छापा

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी एक पथक नेमलं आणि स्वतःच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यास सज्ज झाले. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबीने शादाबवर नजर ठेवली होती. शादाब कोणाला भेटतो, त्याचा माल कुठून येतो, तो कोणाला पुरवतो या सगळ्याची माहिती गोळा करण्याचं काम एनसीबीकडून सुरू होतं. मिळालेल्या रिपोर्टनुसार, काल मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सप्लाय होणार आहे अशी माहिती NCB ला लागली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि वर्सोवा, लोखंडवाला, मीरा रोड या तिन्ही ठिकाणी धाड करत 2 कोटींपेक्षा अधिकचे एमडी ड्रग्स जप्त केले. या सोबतच काही महागड्या गाड्या, रोख रक्कम आणि पैसे मोजण्याची मशीनही एनसीबीने जप्त केली आहे.