मंत्री Nawab Malik यांचे गंभीर आरोप; NCB ने जारी केली प्रेस नोट, Sameer Wankhede यांचे स्पष्टीकरण- 'सर्व आरोप खोटे, मी त्याचा निषेध करतो'
Nawab Malik & Sameer Wankhede (Photo Credits: Facebook, ANI Twitter)

काही दिवसांपूर्वी मुंबई किनाऱ्याजवळील एका क्रुजवर एनसीबीने (NCB) छापा टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) इतर काही लोकांना ताब्यात घेतले होते. आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची (Drug Case) चौकशी करत आहेत. आज एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकला त्यानंतर अनन्याला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यादरम्यान गेले काही दिवस महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) सतत समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत.

एकीकडे एनसीबी पुराव्यांच्या आधारावर बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आपले काम करत आहे, दुसरीकडे मंत्री नवाब मलिक एनसीबीच्या कामावर संशय घेत आहेत. आज मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप केला की, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर एनचीबीने एक विशेष अधिकारी नेमला. सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत होती. सुशांतच्या मृत्यूचे गूढ अद्याप सुटलेले नाही परंतु एनसीबीने चित्रपट उद्योगात हस्तक्षेप सुरू केला. रिया चक्रवर्तीसह इतरांनाही चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले.

 

यासोबतच नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितले की, कोविड दरम्यान संपूर्ण चित्रपट उद्योग मालदीवमध्ये होता. त्याचवेळी अधिकारी आणि त्याचे कुटुंबीयही मालदीव येथे होते. समीर वानखेडे यांना त्यांच्या दुबई आणि मालदीवच्या ट्रीपबाबत माहिती द्यावी लागेल. ते या ठिकाणी काय करत होते हे त्यांना सांगावे लागेल.

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर, एनसीबीने समीर वानखेडे यांच्याबद्दल सोशल मीडियावरील काही माहितीबाबत तथ्य मांडत एक प्रेस नोट जारी केली आहे. प्रेस नोटमध्ये लिहिले आहे की, ‘समीर वानखेडे, आयआरएस, झोनल डायरेक्टर, एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटबाबत सोशल मीडियावर काही चुकीची माहिती शेअर केली गेली आहे.’ (हेही वाचा: मंत्री नवाब मलिक यांच्या वक्तव्यावर एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंचे प्रत्यूत्तर, कायदेशीर कारवाई करण्याचा दिला इशारा)

एनसीबीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, समीर वानखेडे, 31 ऑगस्ट 2020 रोजी NCB मध्ये सामील झाले आणि यानंतर त्यांनी दुबईला रजेसाठी कोणताही अर्ज सादर केला नाही. तसेच सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेनुसार, अधिकाऱ्याने आपल्या कुटुंबासह मालदीवला एक्स-इंडिया रजा घेतली आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना वानखेडे म्हणाले. ‘मी मलिक यांच्या आरोपांचा याचा निषेध करतो. ही चुकीची माहिती आहे. ज्यावेळी मी दुबईमध्ये होतो असे मलिक म्हणत आहे त्यावेळी, डिसेंबरमध्ये मी मुंबईत होतो. ते खोटे आरोप करत आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘खंडणी हा शब्द एक घृणास्पद शब्द आहे. सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेतल्यानंतर मी मालदीवला गेलो होतो. सरकारची परवानगी घेतल्यानंतर मी माझ्या मुलांसह आणि कुटुंबासह तिकडे गेलो होतो. जर याला खंडणी म्हटले तर हे मान्य नाही. गेल्या 15 दिवसात आमच्यावर वैयक्तिक हल्ले केले जात आहेत, मी याचा तीव्र निषेध करतो. मी एक साधा सरकारी अधिकारी आहे. ते  (नवाब मलिक) मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी आणि ड्रग्ज हटवण्यासाठी मला तुरुंगात टाकायचे असेल तर मी त्याचे स्वागत करतो.’

दरम्यान समीर वानखेडे यांनी आपण दुबईला गेल्याचे नाकारल्यानंतर नवाब मलिक यांनी समीर यांची बहिण जस्मिन वानखेडेच्या इन्स्टाग्राम खात्यावरील एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो 10 डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आला आहे. नवाब मलिक यांचा दावा आहे की, या फोटोमध्ये जस्मिनसोबत समीर वानखेडेदेखील आहेत.