Representational Image (photo credit- Pixabay)

वाहन चालवताना अनेक प्रकारचे वाहतूक नियम पाळावे लागतात. वाहतूक नियमांचे पालन केल्याने तुम्ही चालान टाळता आणि तुमचे जीवनही सुरक्षित राहू शकते. असाच एक नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे, ज्याचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. हा नियम सीट बेल्टशी (Seat Belts) संबंधित आहे. मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरपासून कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे.

मुंबई पोलिसांनी सांगितले की, 1 नोव्हेंबरपासून महानगरात चारचाकी वाहन चालक आणि प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात येणार आहे. एका निवेदनात, मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक युनिटने सर्व वाहनचालक आणि वाहनधारकांना 1 नोव्हेंबरपूर्वी चारचाकी वाहनांमध्ये सीट बेल्टची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

1 नोव्हेंबरनंतर, सर्व मोटार वाहन चालक आणि मुंबईच्या रस्त्यावर चारचाकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणे सक्तीचे असेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मोटार वाहन (सुधारणा) कायद्याच्या कलम 194 (ब) (1) अन्वये उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. कायद्यातील तरतुदीनुसार जो कोणी सेफ्टी बेल्ट न लावता मोटार वाहन चालवेल किंवा सीट बेल्ट न लावता प्रवाशांना घेऊन जाईल, त्याला शिक्षा होईल. (हेही वाचा: आता नागपूर ते पुणे फक्त 8 तासात; मंत्री Nitin Gadkari यांची माहिती, जाणून घ्या कसे)

टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा गेल्या महिन्यात पालघर जिल्ह्यात रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. अपघाताच्या तपासात मर्सिडीज कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या उद्योगपतीने सेफ्टी बेल्ट घातला नसल्याचे समोर आले होते. कार भरधाव वेगात होती व ती नदीवरील पुलाच्या दुभाजकाला धडकल्याने तिचा अपघात होऊन मिस्त्री यांचा मृत्यू झाला.