Sanjay Raut On Narhari Zirwal: महाराष्ट्राच्या दृष्टाने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय आणि घटनात्मक पेचावर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळ राजकीय नेत्यांची वक्तव्ये, प्रतिक्रिया आणि डावपेचांनी, भूमिकांनी भारुन गेले आहे. एका बाजूला सत्तासंघर्षात अत्यंत निर्णायक भूमिकेत असलेले विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल असल्याचे वृत्त आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेची चर्चा आहे.
संजय राऊत हे आपल्या खुमासदार भाषाशैली आणि विरोधकांवर कमाल शब्दात किमान वार करण्यासाठी विशेष ओळखले जातात. त्यामुळे राऊत यांनी वापरलेले शब्द, म्हणी आणि वाक्यप्रचार नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा राऊत यांच्या प्रतिक्रिया आणि वक्तव्ये वादग्रस्तही ठरतात. परंतू, त्याचमुळे प्रसारमाध्येमेही राऊत यांच्या प्रतिक्रियेला महत्त्वही देतात. शिवसेना पक्षात झालेल्या अभूतपूर्व बंडानंतर उद्धव ठाकरे एकाकी पडल्याचे चित्र असताना राऊत यांनी निष्टा बदलली नाही. अत्यंत अडचणीच्या आणि तितक्याच कठीण काळातही संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. (हेही वाचा, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल, सत्तासंघर्षाच्या महत्त्वाच्या दिवशी राजकीय चर्चा, तर्कवितर्क वाढले)
संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा मागे लावून घेरण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, राऊत त्यातूनही बाहेर पडले. परिणामी आजही संजय राऊत सकाळी नऊ-दहाच्या दरम्यान, प्रसारमाध्यमांसमोर हजेरी लावतात. विरोधकांचा येथेच्छ समाचार घेतात. राज्यातील सत्तासंघर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांना चिमटा काढला आहे. संजय राऊत यांनी आपल्या हँडलवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!'
दरम्यान, साधारण 11 महिन्यांनंतर राज्यातील सत्तासंघर्षाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे. या निकालात शिवसेनेच्या (शिंदे गट) 16 आमदारांच्या अपात्रतेचा, राज्यपालांच्या भूमिकेचा आणि राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधीही महत्त्वाचा निकाल येणार आहे. सन 1973 मध्ये आलेल्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाचा खटलाही एक मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणार आहे.