Sanjay Raut | Photo Credits: Twitter

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला. या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. काल वाय. बी. चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवारांची पक्षातून हकालपट्टी केली. तसेच त्यांच्याकडील गटनेतेपदही काढून घेण्यात आलं आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्याला 'Accidental शपथग्रहण!', असं म्हटलं आहे. यापूर्वीही संजय राऊत यांनी अजित पवार आणि भाजपवर टीका केली होती. शनिवारी सकाळी झालेल्या शपथग्रहण प्रक्रियेला त्यांनी मुख्यमंत्री शपथविधी होता की दशक्रियाविधी? असा उपरोधिक सवाल केला होता.

संजय राऊत ट्विट -

दरम्यान, शनिवारी सकाळी झालेल्या या निर्णयावर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली होती. शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत अजित पवार आमच्या सोबत बैठकीत उपस्थित होते. परंतु, त्यांच्या हालचाली आणि झुकलेल्या नजरा या संशयास्पद होत्या. स्वतः शरद पवार त्यांच्या या कृत्याने चिंतीत होते. बैठकीनंतर एकाएकी अजित पवार गायब झाले आणि त्यांचा काहीही संपर्क होत नव्हता. सकाळी त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजले. याबाबत शिवसेनेला किंवा खुद्द राष्ट्रवादीला सुद्धा माहिती नव्हती. त्यामुळे अजित पवार यांनी केलेले हे कृत्य रात्रीच्या वेळेत घडलेला व्यभिचार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळिमा फसला आहे. त्यांना महाराष्ट्राची जनता रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही, अशा कठोर शब्दात राऊत यांनी अजित पवारांवर तोफ डागली होती.

त्यानंतर संजय राऊत यांनी आपल्या दुसऱ्या प्रतिक्रियेत 'आम्ही बिनधास्त असल्याचं म्हटलं होत. यात त्यांनी बाळासाहेबांचा फोटो शेअर करत, संघर्षाचा काळ कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याकडे पाहावं लागतं. संघर्षातून दिसतीय ती शिवसेना उभी राहिली, संघर्षातूनच ती पूढे जाईल, असं म्हटलं होत. तसेच राऊतांनी पत्रकार परिषद घेऊनही अजित पवारांवर टीकास्त्र उचललं होतं. भाजपाने सत्ता आणि पैशांच्या जोरावर एका रात्रीत चित्र बदलले. अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला. या घडामोडींमागे केवळ अजित पवारच आहे. शरद पवार यांचा यात कोणताही हात नाही, असं संजय राऊत म्हणाले होते.