
Samruddhi Expressway Expansion: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना जोडण्याच्या उद्देशाने, मुंबई-नागपूर समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या (Mumbai-Nagpur Samruddhi Expressway) विस्तारीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. हा मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प महाराष्ट्राच्या पूर्वेकडील प्रदेशांमध्ये कनेक्टिव्हिटी वाढविण्याचा आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या प्रयत्नाचा एक मोठा भाग आहे. तिसऱ्या टप्प्यात तीन स्वतंत्र टप्प्यातील मार्ग बांधण्यात येणार आहेत. यातील प्रत्येक मार्ग विशिष्ट कनेक्टिव्हिटी गरजा पूर्ण करतो.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर ते गोंदिया 127 किमी लांबीच्या ऍक्सेस-नियंत्रित एक्स्प्रेस वेच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे, ज्याचा अंदाजे खर्च 7,345 कोटी रुपये आहे. याव्यतिरिक्त, भंडारा ते गोंदियाला जोडणारा 28 किमीचा भाग 1,587 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाणार आहे, तर नागपूर ते चंद्रपूर हा 194 किमीचा भाग 9,543.2 कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे.
समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यामागील प्राथमिक उद्दिष्ट महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्ह्यांतील प्रवासाचा वेळ कमी करणे, सुरळीत कनेक्टिव्हिटी सुलभ करणे आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे. या प्रदेशांना महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी जोडून, विकास आणि समृद्धीच्या नवीन संधी उघडण्याचे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. (हेही वाचा: Maharashtra Guava: महाराष्ट्राचा पेरू, असमचे लिंबू, पंजाबची बाजरी, 27 कृषी उत्पादनांची आंतरराष्ट्रीय भरारी)
सध्या, 700 किमी समृद्धी कॉरिडॉरपैकी केवळ नागपूर ते इगतपुरीतील भरवीरपर्यंत असा 600 किमी लांबीचा मार्ग सुरु आहे. डिसेंबर 2022 ते मे 2023 या कालावधीत दोन टप्प्यांत या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर 2022 मध्ये नागपूर आणि शिर्डी दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन केले, तर शिर्डी ते भरवीर दरम्यानच्या मार्गाचे उद्घाटन मे 2023 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र, उर्वरित 101 किमी मार्गावर प्रगती सुरू आहे, चालू वर्षाच्या जुलैपर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याची योजना आहे. तिसऱ्या टप्प्यापूर्वी, या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना 180 किमीच्या पट्ट्याद्वारे जोडण्याची रूपरेषा आखली गेली.