अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | Photo Credits: Facebook

काल 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (93 rd Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) मोठ्या थाटामाटात शुभारंभ झाला. यंदाचे हे साहित्य संमेलन उस्मानाबाद इथे पार पडत आहे. काल ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. मात्र ग्रंथ प्रदर्शनाच्या आधीच संमेलनात पायरेटेड पुस्तकांची (Pirated Books) विक्री होताना आढळली आहे. ही गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे. मुख्य म्हणजे चहा आणि कचोरीच्या सारख्या खाद्यपदार्थांच्या दुकानावर या पुस्तकांची विक्री होत होती. ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलासपूरकर हे नाश्त्यासाठी एका चहाच्या स्टॉलवर गेले असता, तिथे त्यांना हा प्रकार दिसला.

अशा स्टॉल्सवर वाढीव किमतीमध्ये काही लोकप्रिय पुस्तकांच्या पायरेटेड प्रतींची विक्री चालू होती. यामध्ये नरेंद्र जाधव यांचे आत्मचरित्र ‘आमचा बाप आणि आम्ही’ आणि किशोर शांताबाई काळे यांचे आत्मचरित्र ‘कोल्हाट्याच पोर’ या पुस्तकांच्या पायरेटेड प्रती होत्या. महत्वाचे म्हणजे ही दोन्ही पुस्तक ग्रंथाली प्रकाशनने प्रकाशित केली आहेत. त्यासोबतच अनेक नामवंत लेखकांची पुस्तकेही इथे उपलब्ध होती. मराठवाड्यात पायरेटेड पुस्तकांचा व्यवहार करणारे 8 विक्रेते आहेत, मात्र चक्क साहित्य संमेलनात पायरेटेड पुस्तके विकली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

(हेही वाचा: 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रिटो प्रकृती बिघडल्यामुळे मुंबईत परतले)

‘कोल्हाट्याचं पोर’ या पुस्तकाची छापील किंमत 125 रुपये आहे. पण या पुस्तकाची पायरेटेड प्रत 150 रुपयांना विकली जात होती. तर, ‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकाची छापील किंमत 150 रुपये असताना, त्याची पायरेटेड प्रत 250 रुपयांना विकली जात होत होती. वाचकांची ही मोठी फसवणूक असून, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी हिंगलासपूरकर यांनी केली. या विक्रेत्याने ही पुस्तके रद्दीमधून मिळाल्याचे सांगितले. सध्या तरी त्याच्याकडून ही पुस्तके जप्त करण्यात आली आहेत.