Sanjay Raut (Photo Credit : Twitter)

24 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election 2019 Result) लागला. मात्र अजूनही राज्यात सत्तास्थापन होऊ शकली नाही. भाजप व शिवसेना (BJP Shivsena) दोन्ही पक्ष आपापल्या अपेक्षांवर ठाम आहेत. अशात 145 चा आकडा पार करण्यासाठी आमदार फोडण्याचे राजकारण केले जाते. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली आहे. तसेच आपल्या आमदारांवर आपला विश्वास आहे त्यामुळे पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांना ठेवणे ही पूर्णतः अफवा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

माध्यमांना दिलेल्या मुलाखती मध्ये संजय राऊत म्हणाले, ‘सध्या महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे त्यामध्ये तोडाफोडीचे राजकारण केले जाते. मात्र त्यासाठी आम्हाला आमच्या आमदारांना कुठेही हलवण्याची गरज नाही. आमचे आमदार त्यांच्या मतांवर ठाम आहेत आणि पक्षाशी वचनबद्ध आहेत. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांनी आधी आपल्या आमदारांची चिंता करावी.’ (हेही वाचा: "शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री होईल, ही गोड बातमी"- संजय राऊत)

यासोबतच त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही असेही सांगितले आहे. अशाप्रकारे आमदारांना शिवसेनेकडून रिसॉर्टवर पाठवण्यात येणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच ज्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठी लागणारे 145 हे संख्याबळ आहे, त्यांनी जरूर सरकार स्थापन करावे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपवर शाब्दीक हल्ला चढवत, महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार स्वत: ही गोड बातमी घेऊन येतील, असे विधान केले आहे.