मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) सह राज्यातील रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी 9 जुलै पासून बेमुदत संप (Strike) पुकारण्याची हाक दिली आहे. यामध्ये रिक्षा भाडेवाढ करण्यापासून ते ऑटोरिक्षा चालक-मालकांचे कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत स्थापन करण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीची एक मीटिंग जूनमध्ये मुंबईत पार पडली होती तसेच मागण्यांवर 30 जूनपर्यंत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला कृती समितीतर्फे निवेदन देखील देण्यात आले होते. मात्र अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने 9 जुलै पासून संप पुकारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
या संपात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांमधील लाखो रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. त्यामुळं दररोज रिक्षानं प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांचे हाल होणार आहेत. बोगस, मुजोर रिक्षा चालकांवर कारवाई; रिक्षा प्रवासाच्या तक्रारीसाठी टोल फ्री नंबर जारी
अशा आहेत रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या
- ओला, उबरसारख्या अवैध टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करावी
- रिक्षा चालक-मालकांसाठी असलेले कल्याणकारी महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे
- विमा कंपनीत भरण्यात येणारे पैसे तिथे न भरता कल्याणकारी महामंडळात जमा करावे
- चालक-मालकांना पेन्शन, उपदान (ग्रॅज्युईटी), भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय मदत दिली जावी
- जुन्या हकिम समितीच्या शिफारशीनुसार रिक्षा भाड्यात चार ते सहा रुपये वाढ करावी
- बेकायदा प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकाची नियुक्ती करावी
दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना कृती समितीकडून निवेदन पत्रक देण्यात आले होते मात्र त्यावर काहीच कृती न झाल्याने 9 जुलै पासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे.